सातारा – धबधब्यामध्ये बुडालेल्या राहुल सुभाष माने (वय 18, रा. संगमनगर, सातारा) या युवकाचा मृतदेह शोधण्यामध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीमच्या जवानांना यश आले. धबधब्याच्या खोल प्रवाहामध्ये राहुल याचा मृतदेह आढळून आला. मंगळवारी सकाळी सात वाजता दोन तासांच्या प्रयत्नानंतर हा मृतदेह शोधण्यात यश मिळाले.
या दुर्दैवी घटनेबाबत अधिक माहिती अशी, राहुल मित्रांसमवेत घरच्यांना न सांगता शुक्रवारी दि. 22 रोजी केळवली येथे धबधब्यावर फिरायला गेला होता. तेथे पाण्याचा अंदाज न आल्याने तो अचानकपणे धबधब्यामध्ये बुडाला. त्याच्या सोबतच्या मित्रमंडळींनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला.
तरी तो आढळून आला नाही. सातारा तालुका पोलीस तसेच परिसरातील ग्रामस्थांनी वेळोवेळी शोध मोहीम राबवूनसुद्धा त्यांच्या प्रयत्नांना यश येत नव्हते. त्यामुळे बचाव यंत्रणेला रिकाम्या हातानेच माघारी परतावे लागले. या कामासाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीमचे जवान घटनास्थळी मंगळवारी सकाळी उपस्थित झाले. त्यावेळी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर केळवली धबधब्याच्या खोल पाण्यामध्ये राहुल माने याचा मृतदेह आढळून आला.
शुक्रवारी न सांगता बाहेर पडलेल्या राहुल माने याने धबधब्यावर गेल्यानंतर आपल्या वडिलांना व्हिडिओ कॉल करून आपण मित्रांसमवेत केळवली येथे फिरायला आल्याचे सांगितले. इतक्या लांब तू का गेलास फिरायला जवळच कुठेतरी जायचे होते, असे वडिलांनी सांगितले तेव्हा राहुलने “काळजी करू नका, मी संध्याकाळपर्यंत परत येतो, असे सांगितले. मात्र, त्याआधीच दुर्दैवी घटनेमध्ये राहुल धबधब्यात बुडाल्याने माने परिवारावर शोककळा पसरली आहे. राहुलचा हा व्हिडिओ कॉल शेवटचाच ठरल्याने सगळ्यांनाच गहिवरुन आले.