ठाणे: ठाण्यातील भाजपचे नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ठाण्यात एका हॉटेलमध्ये कांबळे यांचा मृतदेह आढळला. विलास कांबळे यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समजू शकले नाही.
विलास कांबळे गेल्या काही दिवसांपासून एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. हॉटेल व्यवस्थापनाला कांबळे यांच्या रुममधून दुर्गंधी आल्याने त्यांनी पोलिसांना बोलावले. त्यावेळी त्यांचा मृतदेह आढळला. हृदयविकाराच्या धक्क्याने कांबळे यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कांबळे यांचे पार्थिव ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
विलास कांबळे हे ठाणे महापालिकेत स्थायी समितीचे माजी सभापती होते. विलास कांबळे सुरुवातीला बसपमध्ये होते. 2016 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. प्रभाग क्रमांक 15 ड मधून ते नगरसेवकपदी निवडून आले. त्यांची पत्नी सुवर्णा कांबळेही ठाणे महापालिकेत नगरसेविका आहे.