श्रीनगर – जम्मू काश्मीरमधील बांदिपोरा जिल्ह्यात प्रत्यक्ष ताबारेषेजवळ दोन स्थानिक दहशतवाद्यांचे मृतदेह सुरक्षा रक्षकांना आढळून आले आहेत. या दोन्ही दहशतवाद्यांजवळ शस्त्रे आणि दारुगोळाही होता. उत्तर कश्मीरमधील गुरेझ भागातील तुलैलमध्ये किशनगंज नदीमध्ये पोलीस आणि लष्कराला शनिवारी हे मृतदेह अढळून आले. हे मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी गुरेझ येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.
या दोन्ही मृत दहशतवाद्यांजवळ एके-47 मॅगझीन, 115 एके-47 ची काडतुसे, 9 एमएम राऊंडचे पिस्तुल, हातबॉम्ब, वायरलेस सेट, चार मनगटी घड्याळे, पाऊच, जॅकेट आणि मॅट्रीक्स शीट आढळून आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या दहशतवाद्यांकडील कागदपत्रांनुसार त्यांच्यापैकी एकाचे नाव समीर अहमद दर असून तो दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील डोंग्रीपोरा भागातील रहिवासी होता.
पोलिसांकडील नोंदीनुसार तो मे 2018 पासून बेपत्ता होता आणि हिज्बुल मुजाहिदीनमध्ये सामील झाला असल्याची माहिती मिळाली होती. दुसऱ्या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. ओळख पटवण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना बोलवण्यात आले आहे.
सीमा ओलांडून घुसखोरी केल्यानंतर नदी ओलांडण्याच्या प्रयत्नात हे दोघेही बुडून मरण पावले असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे.