चेन्नई : चेन्नईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामध्ये डॉक्टर त्याची पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे. ही घटना चेन्नईतील अण्णा नगरमध्ये घडल्याचे सांगितले जात आहे. एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूनं परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांच्या मते, हे सामूहिक आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसून येत आहे.
पोलीस सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी मृतांची ओळख डॉ. बालमुरुगन, त्यांची पत्नी सुमती (जी वकील होती), मुलगा जसवंत कुमार जो नीटची तयारी करत होता आणि लिंगेश कुमार जो अकरावीचा विद्यार्थी होता अशी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी हे सर्व मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवून तपासाला सुरूवात केली. डॉक्टर दाम्पत्य खूप आनंदी होते, ऐशो-आरामात जीवन जगत होते असं डॉक्टरच्या वाहन चालकाने सांगितले. प्राथमिक तपासात २ कारणामुळे आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील चौघाच्या मृत्यूचं कारण कर्जाचा बोझा आणि मुलावर नीट परीक्षेचा दबाव हे असण्याची शक्यता आहे. डॉक्टर बालामुरुगन हे सोनोलॉजिस्ट होते. त्यांची पत्नी सुमथी वकील होती तर २ मुले जसवंत कुमार आणि लिंगेश कुमार यांचा मृतदेह दोन वेगवेगळ्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला.
जसवंत कुमार हा नीटची परीक्षा देत होता. डॉक्टर बालामुरुगन अनेक अल्ट्रासाऊंड सेंटर चालवायचे. आज सकाळी त्यांचा वाहन चालक घरी पोहचला त्याने दरवाजा ठोठावला परंतु काहीच उत्तर आले नाही. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. त्यांनी घरचा दरवाजा उघडताच या चौघांच्या मृत्यूचं समोर आले. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सुरुवातीच्या तपासानंतर आम्हाला वाटते की हे आत्महत्येचे प्रकरण आहे. तथापि, आम्ही अजूनही वेगवेगळ्या दृष्टिकोनातून या प्रकरणाची चौकशी करत आहोत. तपास पूर्ण झाल्यानंतरच निश्चितपणे काही सांगता येईल.