जेरुसलेम : हमासने इस्रायलमधून अपहरण केलेल्यांपैकी ६ ओलिसांचे मृतदेह आज गाझामध्ये सापडले. यामध्ये मूळ इस्रायली- अमेरिकन वंशाच्या युवकाचाही समावेश आहे. हेर्ष गोल्डबर्ग-पोलिन असे या युवकाचे नाव असून त्याच्या पालकांनी आपल्या मुलाच्या सुटकेसाठी जागतिक पातळीवरीन नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यामुळे त्याचे नाव सर्वाधिक चर्चेत होते. गेल्या महिन्यात शिकागो येथे झालेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्यावेळी देखील गोल्डबर्ग-पोलिन यांच्या पालकांनी आपल्या मुलाच्या सुटकेचा मुद्दा उपस्थित केला होता.
हत्या झालेल्या अन्य ओलिसांमध्ये २५ वर्षीय ओरी डॅनिनो, २४ वर्षीय एडन येरुशल्मी, २७ वर्षीय अल्मोग सरुसी, आणि ३३ वर्षीय अलेक्झांडर लोबानोव यांचा समावेश आहे. तर कार्मेल गॅट या ४० वर्षीय सहाव्या व्यक्तीचे जवळच्या बेरी येथील शेतकरी समुदायातून अपहरण करण्यात आले होते.हमासच्या तावडीतल्या इस्रायलींच्या सुटकेसाठी इस्रायली सैन्याकडून राबवल्या जात असलेल्या मोहिमेदरम्यान या सर्वांचे मृतदेह सापडले. सुटका केली जाण्याच्या काही वेळ आगोदरच त्या सर्वांची हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज आहे.
इस्रायली नागरिकांची हत्या झाल्याचे उघड झाल्यावर इस्रायलमध्ये पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांच्याविरोधात मोठा जनक्षोभ उसळला आहे. हमासने अपहण केलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी यापूर्वीच ओलिसांची जिवंत सुटका करण्यात अपयश आल्याबद्दल नेतान्याहू यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे वेस्ट बँकमध्ये बंदुकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात तिघेजण ठार झाले. गेल्या काही दिवसांपासून वेस्ट बँकेतील पॅलेस्टिनी दहशतवाद्यांना शोधून मारण्यासाठी इस्रायलने मोहीम सुरू केली आहे.
हेर्ष गोल्डबर्ग-पोलिन याच्यासह इतर चौघांना हमासच्या दहशतवाद्यांनी गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी दक्षिण इस्रायलमधील संगीताच्या कार्यक्रमाच्या ठिकाणावरून अपहरण करून नेले होते. पोलिन मूळचा कॅलिफोर्नियातील बर्कले येथील रहिवासी होता. हमासच्या हल्ल्याच्यावेळी झालेल्या ग्रेनड हल्ल्यात त्याच्या डाव्या हाताचा काही भाग तुटला होता. एप्रिल महिन्यात हमासने त्याचा हात तुटलेल्या अवस्थेतील एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. हा व्हिडीओ बघून इस्रायलमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती. गोल्डबर्ग-पोलिन आणि इतर ओलिसांची इस्रायल सरकारने तात्काळ सुटका करावी,अशी मागणी केली गेली होती.