घुलेवाडीत उमेदवाराच्या नावाचा फलक झाकला

सी-व्हिजिल ऍपवर केली होती तक्रार ः ग्रामसेवकाच्या अडचणीत वाढ

संगमनेर  – आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवर प्रशासनाने कारवाई सुरू केली असून, रविवारी सकाळी सी-व्हिजिल या निवडणूक आयोगाच्या ऍपवर करण्यात आलेल्या एका तक्रारीत प्रशासनाला तथ्य आढळल्याने पथकाने घटनास्थळी जाऊन कारवाई केली. त्यामुळे ग्रामसेवकाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

घुलेवाडी येथे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विकास निधीतून सभामंडपाचे दोन वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून खा. लोखंडे पुन्हा शिवसेनेचे उमेदवार असल्याने स्थानिक पातळीवर ग्रामसेवकाकडून आदर्श आचारसंहितेचे पालन होणे अपेक्षित होते. उमेदवाराच्या नावाचे फलक, बॅनर काढणे ही त्यांची जबाबदारी होती. मात्र लोखंडे यांच्या विकास निधीतून बांधलेल्या या सभामंडपावर त्यांच्या नावाचा फलक तसाच असल्याने या संदर्भात सी-व्हिजिल ऍपवर तक्रार करण्यात आली.

संबधितांनी सभा मंडपाचा फोटोदेखील अपलोड केल्याने ऍपवरील या तक्रारीसंदर्भात माहिती मिळताच प्रांताधिकारी मंगरुळे यांनी तातडीने संबंधितांना खात्री करण्याचे आदेश दिले. पथकाने तेथे जाऊन खात्री केल्यानंतर ऍपवर आलेल्या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे आढळून आले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तातडीने सभा मंडपाचा नामफलक झाकून टाकला. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी यासंदर्भात संबंधित ग्रामसेवकावर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले. यासंबंधीचा अहवाल आयोगाकडे पाठविण्यात आला. ऍपवर तक्रारदाराला आपले नाव गोपनीय ठेवण्याची किंवा जाहीर करण्याची सोय असल्याने निवडणूक रंगात येतानाच या ऍपवरील तक्रारींत देखील मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आचारसंहिता भंगाच्या तक्रारी देखील दाखल केल्या जाऊ शकणार असल्याने उमेदवारांचे समर्थक अडचणीत सापडणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.