बलरामपूर – डीजेच्या दणदणाटाने ब्रेन हॅमरेज झाल्याची घटना छत्तीसगड राज्यात समोर आली आहे. डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने या व्यक्तीला गरगरल्यासारखे झाले. तो जागीच कोसळला. त्यानंतर त्याला तातडीने अंबिकापूर जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.
त्याची गंभीर अवस्था पाहता डॉक्टरांनी त्याला तातडीने रायपूर येथील रुग्णालयात पाठवले. त्याठिकाणी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना त्याच्या मेंदूची रक्तवाहिनी फाटल्याचे आणि रक्त गोठल्याचे आढळले. डीजे दणदणाटामुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
बलरामपूर येथील 40 वर्षीय संजय जायसवाल याला 9 सप्टेंबर रोजी अचानक चक्कर आले. त्याला उलटी पण झाली. त्यामुळे घरची मंडळी एकदम घाबरुन गेली. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथल्या नाक, कान, घसा तज्ज्ञाने तातडीने उपचार सुरू केले. त्याचे सीटी स्कॅन करण्यात आले. त्यावेळी त्याच्या डोक्याच्या पाठीमागील रक्तवाहिनी फुटल्याचे आणि रक्त गोठल्याचे दिसून आले.
डॉक्टरांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. वरिष्टांनी कुटुंबियांकडे त्याला एखादा आजार होता का याची माहिती विचारली. पण तो काल परवा पर्यंत तंदुरुस्त होता हे स्पष्ट झाले. तर डीजेचा दणदणाट त्याला सहन न झाल्याने नस फाटल्याचे समोर आले. त्याचा बीपी सुद्धा नॉर्मल असल्याचे समोर आले.
धार्मिक उत्सावादरम्यान डीजे वाजविण्याचे प्रकार हल्ली वाढले आहे. लग्न कार्यात सुद्धा डीजेच्या दणदणाटासमोर नाचणारी अबालवृद्ध सर्रास दिसतात. पण त्यामुळे त्यांना त्रास होत असल्याच्या घटना पण समोर येत आहे. याच कारणामुळे या तरुणाचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे.
किती डेसिबलची क्षमता?
एक तंदुरुस्त व्यक्ती 70 डेसीबल ध्वनीची तीव्रता सहन करु शकतो. त्यापेक्षा अधिक आवाज असेल, गोंगाट, दणदणाट, कर्णकर्कश आवाज असेल तर त्याच्या कानावर आणि मेंदूवर त्याचा अत्यंत वाईट परिणाम होतो, असे डॉक्टरांचे मत आहे. डीजेचा दणदणाट हा 150 डेसीबल वा त्यापेक्षा पण अधिक असतो.
धार्मिक कार्यक्रम, लग्नादरम्यान ज्या मिरवणुका जातात. त्या गेल्यावर घरातील अनेक वस्तूंना हादरे बसत असल्याचे जाणवते. त्यामुळे डीजेसमोर नाचणाऱ्यांच्या कानावर आणि मेंदूवर त्याचा किती विपरीत परिणाम होत असेल हे सांगायला नको. महाराष्ट्रात अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवात लेझर लाईटवर बंदी घातली आहे. तसेच डीजेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे.