कुन्नूर, नवी दिल्ली – संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत आणि अन्य 12 जणांच्या मृत्यूला कारणीभूत झालेल्या हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स आज सापडला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेमध्ये केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली.
या अपघाताच्या कारणांचा तपास करण्यासाठीची चौकशी यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. या अपघातात बचावलेल्या एकमेव व्यक्तीला अपघात झालेल्या ठिकाणापासून जवळच असलेल्या वेलिंग्टन येथे जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले आहे, असेही सिंह यांनी सांगितले.
फ्लाईट डाटा रेकॉर्डरसह दोन्ही ब्लॅक बॉक्स सापडले आहेत. जेथे अपघात घडला त्या भागातील 300 मीटर ते एक किलोमीटरच्या परिसरात मोठी शोधमोहिम राबवण्यात आली होती. अपघाताच्या कारणांच्या तपासासाठी या ब्लॅक बॉक्स नवी दिल्ली किंवा बेंगळूरूला नेल्या जाणार आहेत.
एमआय-17 व्ही एच या हेलिकॉप्टरच्या अपघाताची कारणे या ब्लॅक बॉक्समधील डाटाच्या आधारे शोधली जाऊ शकणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.या अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींचे मृतदेह लष्कराच्या वाहनातून वेलिंग्टनमधील मद्रास रेजिमेंट सेंटरला आणण्यात आले आहेत.
लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, तामिळनाडूचे मंत्री आणि लष्कराच्या दिग्गजांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर हे मृतदेह कोईम्बतूरला नेले गेले. तेथून हवाई दलाच्या विशेष विमानाने हे मृतदेह विमानाने नवी दिल्लीला आणले जाणार आहेत.
तपासाचे काम सुरू
हेलिकॉप्टरच्या अपघाताची कारणे शोधण्यासाठी एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. तपासासाठी तज्ञांचे पथक कालच वेलिंग्टन येथे दाखल झाले असून तज्ञांनी आपल्या कामाला प्रारंभ देखील केला असल्याचे राजनाथ सिंह यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी क्षणभर मौन पाळले.