भाजपला शेतकरी हा पाकपेक्षा मोठा शत्रू वाटतो – बाळासाहेब थोरात

सांगली – भाजपाला शेतकऱ्यांची जिरवायची आहे म्हणूनच परदेशातून शेतमाल आयात करण्यात येत आहे. पाकिस्तानातून देखील कांदा आयात करण्यात येत आहे. पाकिस्तानपेक्षा भाजपाला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो, अशी घणाघाती टीका महसूलमंत्री, कॉंग्रेस प्रदेशाध्यश बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर केली आहे.

सांगली येथे नवीन कृषी धोरणाविरोधात आयोजीत करण्यात आलेल्या रॅलीत ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार विश्‍वजीत कदम यांच्यासह कॉंग्रेसचे नेते उपस्थित होते. बाळासाहेब थोरात म्हणाले, केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब आणि हरियाणा राज्य तापून उठले आहे. तेथे आजही आंदोलन सुरू आहे. अद्याप राज्यातील शेतकऱ्यांना चिमटा बसला नसला तरी धोका कायम आहे.

आज शिल्लक साखरेचा प्रश्न गंभीर असताना निर्यात बंदी केली. याचा अर्थ शेतकऱ्यांची जिरवायची आहे. कांदा आयात करायला सुरवात केली असून पाकिस्तानातून कांदा आणण्याचाही घाट रचला जात आहे. म्हणजे आज देशातील भाजप सरकारला पाकिस्तानपेक्षा शेतकरी मोठा शत्रु वाटतो. दुधाची पावडर मोठ्या प्रमाणात शिल्लक असताना केंद्र सरकार परदेशातून पावडर आयात करण्याचा निर्णय घेते. दूधाचे भाव न वाढण्यास केंद्र सरकारच जबाबदार आहे. तशातच कृषी विरोधी कायदे आणले आहेत. त्यामुळेच कायद्याविरोधात कॉंग्रेसने एल्गार केला आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.

राज्यात कॉंग्रेसची लाट
केंद्र मूठभर लोकांसाठी काम करत आहे. केंद्र सरकारने धर्माचे नाव घेऊन भेदभाव करायचा, आपली पोळी भाजायची. पाहिजे तेवढा अन्याय जनतेवर करायचा, जनता काही बोलत नाही. पण हे आता चालणार नाही, असा इशारा थोरात यांनी दिला. राज्यात आता कॉंग्रेसची लाट येणार आहे. संपूर्ण राज्यात अनेक मंडळी कॉंग्रेसमध्ये येणार असून राज्यात कॉंग्रेसचे राज्य निर्माण झालेले दिसेल, असे संकेतही त्यांनी दिले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.