मुर्खांमधील सगळ्यात मोठा मूर्ख म्हणून उल्लेख
चंडीगढ : नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला (का) कडाडून विरोध करणारे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना भाजपचे खासदार नायबसिंह सैनी यांची जीभ घसरली. त्यांनी राहुल यांचा उल्लेख मुर्खांमधील सगळ्यात मोठा मूर्ख अशा शब्दांत केला.
हरियाणाचे माजी मंत्री असणाऱ्या सैनी यांनी कायद्याला विरोध करत असल्याबद्दल राहुल आणि कॉंग्रेसवर टीकेची झोड उठवली. का आहे काय आणि कशासाठी आहे तेच राहुल यांना ठाऊक नाही. आपण कशाला विरोध करतोय हेच त्यांना माहीत नाही.
मोदी सरकारची कोंडी करता येईल असा कुठलाच मुद्दा कॉंग्रेसकडे नाही. त्यामुळे तो पक्ष नव्या कायद्यावरून देशातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे, असे सैनी कैथलमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले. त्यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे आमदार लीलाराम गुर्जरही होते.
गुर्जर यांनीही काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केले होते. आजचा भारत महात्मा गांधी आणि पं.जवाहरलाल नेहरू यांचा नाही. आजचा भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आहे. का आणि एनआरसीला विरोध करणाऱ्यांचा एका तासात सफाया केला जाऊ शकतो, असे त्यांनी म्हटले होते.