मुश्रीफ म्हणाले, “भाजपने मला ऑफर दिली”; फडणवीसांचे प्रत्युत्तर,”आमचे ऑफर लेटर मैदानात पडलेले नाहीत”

मुंबई : किरीट सोमय्या सातत्यानं महाविकासआघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून सोमय्यांनी हसन मुश्रीफांकडे आपला मोर्चा वळवला आहे. तसेच त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर 150 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. या आरोपांनंतर राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.  याच प्रकरणात आता  माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत देवेंद्र फडणवीस  यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. गृहमंत्र्यांनी केलेली कारवाई मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल, अशी खोचक प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सोमय्या यांच्यावरील ही कारवाई मुख्यमंत्री कार्यालयाची नाही तर गृह मंत्रालयाची आहे, असे स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. याच सर्व घडामोडींबाबत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी, नसेल माहिती मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांनी केलेल्या कारवाईची, असा उपरोधिक टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यावर बोलताना म्हणाले की, मला असं वाटतं की, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं असेल की, एक व्यक्ती भ्रष्टाचाराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करायला जातो आणि पोलीस त्याला अडवतात. यासाठी कारण सांगितलं जातं की, तिथे ज्यांच्याविरोधात तक्रार करायची आहे, त्यांचे कार्यकर्ते दंगा करतील, म्हणून तुम्हाला जाता येणार नाही. स्वतंत्र भारतात, अशाप्रकारची कायदा-सुव्यवस्था यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नसेल. महाराष्ट्रात तर नाहीच नाही. त्यामुळे एकूणच जे काही चाललं आहे, ते भयानक आहे. पण भाजप काही थांबणार नाही. सातत्यानं भ्रष्टाचाराविरोधातील लढाई भाजप लढत राहिल.”

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “असं असू शकतं की, मुख्यमंत्र्यांना माहीत नसेल. ही कारवाई थेट गृहमंत्र्यांनी केली असेल. पण माझं मत असं आहे की, मुख्यमंत्र्यांना कळाल्यानंतर त्यांनी दखल घेऊन अशी कारवाई थांबवली पाहिजे.”

हसन मुश्रीफांनी दावा केलाय की, मला चंद्रकांत पाटलांनी भाजपमध्ये येण्याची ऑफ दिली होती. मी गेलो नाही म्हणून मला टार्गेट केलं जातंय. त्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, “कोणी ऑफर दिली मुश्रीफांना? आम्ही असं ऑफर घेऊन फिरत थोडी असतो. असे आमचे ऑफर लेटर मैदानात पडलेले नाहीत, कोणालाही द्यायला.” असे म्हणत फडणवीस यांनी मुश्रिफांना सडेतोड उत्तर दिले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.