पर्रीकरांच्या चितेची आग विझेपर्यंत तरी थांबायला हवे होते!- शिवसेना

मुंबई: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाल्यानंतर गोव्यात सत्ता टिकवण्यासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा कसरत पाहायला मिळाली. मनोहर पर्रीकर यांचे पार्थिव अनंतात विलीन झाले, पण त्यांच्या देहाची राख गोमंतकच्या भूमीत विलीन होण्याआधीच सत्ता-खुर्चीचा लाजीरवाणा खेळ सुरू झाला होता. अखेर हपापलेल्या बोक्याप्रमाणे आपापला वाटा घेऊन हा खेळ सोमवारी मध्यरात्रीनंतर संपला.

गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून सोमवारी मध्यरात्री प्रमोद सावंत यांनी शपथ घेतली, तर विजय सरदेसाई व सुदिन ढवळीकर हे दोन उपमुख्यमंत्री म्हणून नेमले जाणार आहेत. लोकशाहीचा हा खेळखंडोबाच म्हणावा लागेल. पर्रीकरांच्या चितेची आग विझेपर्यंत तरी थांबायला हवे होते? अशा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.

सोमवार मध्यरात्रीऐवजी मंगळवारची सकाळ उजाडली असती तर गोव्यावर असा कोणता डोंगर कोसळणार होता? पर्रीकर यांच्या निधनाने हा डोंगर आधीच कोसळला आहे व त्यांच्या पार्थिवावर वाहण्यात आलेल्या फुलांचे अद्याप निर्माल्य झालेले नाही, पण बकासुराप्रमाणे सत्तासुरांची वखवख वाढल्याने रात्रीच्या अंधारात सर्वकाही उरकून घेतले गेले. मंगळवारची पहाट उगवली असती तर कदाचित भाजपचे सरकार उडाले असते व ज्यांनी उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथा घेतल्या त्यातल्या एखाद्याने काँग्रेसच्या वळचणीला जाऊन हवे ते पदरात पाडून घेतले असते, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.