नेवासा : नेवासा बुद्रुक येथे सतराव्या शतकातील अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकाळातील गणेश मूर्तीस अभिषेक घालून विधिवत पूजनाने गणेश जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आलेल्या शेकडो सुवासिनींनी सजविण्यात आलेल्या पाळण्यात गणरायाला ठेऊन पाळणा गाऊन विघ्नहर्त्या गणरायाचा जन्मोत्सव साजरा केला.
सतराव्या शतकातील गणपतीची मूर्ती बाहेर ओट्यावर होती. मात्र पुरातन म्हाळसा खंडोबा मंदिराचे जीर्णोद्धारक संभाजीराव ठाणगे यांनी या ठिकाणी सुशोभिकरण करून छोटेखानी मंदिर भाविकांच्या सहकार्यातून उभे केले. या मंदिराचा पहिला वर्धापनदिन ही यावेळी साजरा करण्यात आला.
गणेश जयंती निमित्त वेदमंत्राच्या जयघोषात नेवासा खुर्द येथील सेवानिवृत्त शिक्षक श्री उंडे सर व संभाजीराव ठाणगे यांच्या हस्ते गणेश मूर्तीस अभिषेक घालण्यात आला.यावेळी उपस्थित ठाणगे,मारकळी,शेंडे,भाकरे, रहाट,दळवी,फसले,दाणे, पवार या कुटूंबातील महिलांसह कु.दुर्वा ठाणगे या बालिकेने पाळण्याची दोरी ओढत पाळणा सादर केला.
यावेळी उपस्थित शेकडो सुवासिनींनी सामूहिक पद्धतीने गणपतीची आरती गाऊन पुष्पवृष्टी करून गणरायाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. ग्रामपुरोहित जोशी यांनी झालेल्या जन्मसोहळा कार्यक्रमाचे पौरोहित्य केले.
यावेळी उपस्थित भाविकांना शाबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आले.भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आलेल्या गणेश जन्मोत्सव सोहळ्याच्या प्रसंगी पुरातन म्हाळसा-खंडोबा बाणाई मंदिराचे व्यवस्थापक संभाजीराव ठाणगे,बाळासाहेब मारकळी,प्रवचनकार रंजनताई भाकरे,पुजारी प्रसाद रहाट,सौ.स्वाती रहाट, पुरातन म्हाळसा खंडोबा बाणाई मंदिराचे सेवेकरी बालू फसले,संजय कुटे,राजेंद्र काशीद,अनिल बोरकर, गणेश मंडलिक, शांताराम बोर्डे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.