खाशाबांची जयंती ऑलिम्पिक पदक पूजनाने साजरी

कोल्हापूर : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांची 95 वी जयंती ध्रुवतारा फाऊंडेशनच्या वतीने त्यांनी जिंकलेले ऑलिम्पिक पदक पूजन करून पुण्यात महाराष्ट्र क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी ऑलिम्पिकपटू मनोज पिंगळे यांना खाशाब जाधव पुरस्काराने गौरवित करण्यात आले.

वारजे येथील सह्याद्री कुस्ती संकुलाच्या सभागृहात ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या 95 वी जयंतीचा विशेष समारंभ साजरा झाला. यावेळी 1988 च्या ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व मनोज पिंगळे व कुस्तीगीर विजय पाटील यांना स्व. खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजीत जाधव यांच्या हस्ते खाशाबा जाधव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

अडीच हजार, पुस्तके, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी स्वामी समर्थ ज्ञानपीठाचे अध्यक्ष विजय बराटे, हिंदकेसरी अमोल बराटे, ध्रुवतारा फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय दुधाणे, महेश मालुसरे, रामचंद्र भूमकर आदी मान्यवर उपस्थित होते.

हेलसिंकी 1952 च्या स्पर्धेत देशासाठी खाशाबा जाधव यांनी जिंकलेल्या ऑलिम्पिक पदक व त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी रणजीत जाधव व लेखक संजय दुधाणे यांनी खाशाबांच्या अनेक आठवणींला उजाळा दिला.

प्रतिकुल परिस्थितीवर मात करून वडिलांनी जिंकलेले पदक हे आजही महाराष्ट्राचे एकमेव पदक असल्याची खंत रणजीत जाधव यांनी व्यक्त केली. त्यांचा 15 जानेवारी हा जन्मदिन राज्यशासनाने राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. देशासाठी खेळताना खाशाबा जाधव यांनी जिंकलेले पदक आजही प्रेरणा देणारे असल्याचे सांगून संजय दुधाणे पुढे म्हणाले की, खाशाबांचा वारसदार महाराष्ट्रातून निर्माण झाला पाहिजे.

सेऊल ऑलिम्पिक उपांत्य फेरीपर्यंत कशी धडक मारली हे सांगून खाशाबा जाधव पुरस्कार प्राप्त यांनीही उपस्थित खेळाडूंना यशाचा कानमंत्र दिला. खाशाबा जाधव माझेही प्रेरणास्थान होते त्यांचासारखे पदक जिंकण्यास मी मुकलो तरी आज सुविधा असल्याने नवा खाशाबा उदयाला आला पाहिजे असे मनोज पिंगळे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय बराटे केले. आभार गणेश भरेकर यांनी मानले तर सूत्र संचालन प्रदिप पाटील यांनी केले. कार्यक्रमानंतर खाशाबा जाधव यांचे ऑलिम्पिक पदक पहाण्यास खेळाडूंची मोठी गर्दी उसळली होती.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.