बायोमेडीकल वेस्ट उघड्यावर टाकले

हडपसरमधील हॉस्पीटलला 25 हजारांचा दंड : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाची कारवाई

पुणे – हॉस्पिटलमधील धोकादायक बायोमेडीकल वेस्ट उघड्यावर टाकणे हडपसरमधील लाईफ केअर हॉस्पिटलला चांगलेच महागात पडले आहे. हा कचरा उघड्यावर टाकल्याने या हॉस्पिटलकडून तब्बल 25 हजार रुपयांचा दंड महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून वसूल करण्यात आला आहे. हडपसर क्षेत्रीय कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

हॉस्पिटल तसेच रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात बायोमेडीकल वेस्ट तयार होते. त्यात इंजेक्‍शन, सलाईन, ऑपरेशननंतरचे शरीराचे अवयव, रुग्णांसाठी वापरण्यात आलेले बॅंडेज तसेच रुग्णालयात तयार होणाऱ्या कचऱ्याचा समावेश आहे. कायद्याने या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्‍यक आहे. मात्र, रुग्णालयांकडे ही यंत्रणा नसल्याने महापालिकेनेच शहरातील रुग्णालयांसाठी सशुल्क स्वरुपात ही यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी शहरातील रुग्णालयांची नोंदणी करून त्यांना ही सुविधा दिली जाते. मात्र, त्यानंतरही काही रुग्णालयांकडून पैसे वाचविण्याच्या नादात हे वेस्ट कचरा पेटीत टाकला जातो. त्यामुळे शहरातील कचरा वेचकांना या सुया टोचने तसेच या कचऱ्यामुळे आरोग्याचे गंभीर परिणाम सहन करावे लागतात.

हडपसरमधील ससाणे नगरमध्ये सकाळी नऊच्या सुमारास कचरा उचलण्यासाठी गेलेल्या सेवकांना कचऱ्यात इंजेक्‍शनच्या सुया तसेच बायोमेडीकल वेस्ट आढळून आले. त्यांनी तातडीने या प्रकाराची माहिती आपल्या वरिष्ठांना दिली. त्यानंतर आरोग्य निरीक्षक तसेच सहायक आरोग्य निरीक्षकांनी या कचऱ्याची तपासणी केली असता, त्यात लाईफ केअर हॉस्पिटलच्या रिसिट तसेच औषधांच्या चिठ्ठ्या आढळून आल्या. त्यानंतर लगेच या कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटल प्रशासनास ही बाब कळवित या प्रकारापोटी धोकादायक कचरा उघड्यावर टाकल्याने रुग्णालय प्रशासनास 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक संजय घनवट, आरोग्य निरीक्षक राजेंद्र वायदंडे, सादिक शेख, मुकादम वैशाली फुंदे यांनी ही कारवाई केल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.