पुणे – लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून येवून दुचाकीस्वार धडकला. या अपघातात तरुण ठार झाला. याप्रकरणी ट्रकचालकाला सिंहगड पोलिसांनी अटक केली. ही घटना दोन दिवसांपूर्वी रात्री पावणेबाराच्या सुमारास वडगाव बुद्रूक येथे घडली.
अतुल सुधीर कांबळे (45, रा. वरळी, मुंबई) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी जहांगिर अकबर मुजावर (45, रा. दहिसर, मुंबई) याला अटक झाली.
दोन दिवसांपूर्वी रात्री साडेअकराच्या सुमारास जहांगिर ट्रकमधून बेजाबदाररित्या लोखंडी सळईची वाहतूक करीत होता. त्यावेळी वडगाव बुद्रूक परिसरातून अतुल दुचाकीवर घरी चालले होते. अंधारात त्यांना ट्रकमधील सळ्या दिसल्या नाहीत.
त्यामुळे ट्रकला धडकल्यामुळे त्यांच्या अंगात सळ्या घुसल्या. त्यामुळे झालेल्या अपघातात अतुलचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बी. डी. साळुंखे तपास करीत आहेत.