नगरकरांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज! इंग्लंडमधून आलेल्या २५ प्रवाशांपैकी…

पाच जणांच्या अहवालाची जिल्हा प्रशासनाला अजूनही प्रतीक्षा

नगर (प्रतिनिधी) – इंग्लंडमधून नगर जिल्ह्यात दाखल झालेल्या 25 पैकी 20 जणांच्या करोना तपासणीचे अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून, ते सर्व जण निगेटिव्ह असल्याची माहिती प्रशासनाने दिली. तथापि, त्यातील अजून पाच जणांच्या अहवालांची जिल्हा प्रशासनाला प्रतीक्षा आहे. मात्र, ज्या पाच जणांचे स्वॅब पाठविण्यात आले आहेत. त्यांना करोनाविषयक कोणतीही लक्षणे नसल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

गुरुवारी (ता.24) व शुक्रवारी (ता. 25) अशा दोन दिवसांत विदेशातून तब्बल 25 प्रवासी नगर जिल्ह्यात दाखल झाले होते. त्यात नगर शहरातील 19 जणांचा व ग्रामीण भागातील सहा जणांचा समावेश होता, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी माध्यमांना दिली आहे.

दरम्यान, प्राप्त यादीनुसार सर्वच जण येथे दाखल झाले नव्हते. त्यातील काही प्रवासी मुंबईतच थांबले आहेत. मात्र, त्यांचे पत्ते जिल्ह्यातील असल्याने त्यांचा शोध घेण्याचे काम जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या यंत्रणेने केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिली.

शहरात शुक्रवारी (ता. 25) दाखल झालेल्या प्रवाशांमध्ये मिस्किनमळा 4, नीरंजन कॉलनी 2, सावेडी भागातील बॅंक ऑफ महाराष्ट्र सोसायटी 1, माणिकनगर 1 व मध्यवर्ती भागात एक प्रवासी दाखल झाला आहे. ग्रामीण भागात पारनेर येथे दोन, तसेच जामखेड व श्रीरामपूर येथे प्रत्येकी एक प्रवासी दाखल झाले आहेत.

गुरुवारी (ता. 24) मार्केट यार्ड 2, कराचीवाला नगर 4, गुलमोहर रस्ता 3, पाइपलाइन रोड व नवनागापूर येथे प्रत्येकी एक जण दाखल झाला. ग्रामीण भागात काल संगमनेर व श्रीगोंदा येथे प्रत्येकी एक प्रवासी दाखल झाला आहे. या सर्वांनाच तातडीने तपासणी करून घेण्याच्या व क्वारन्टाइन राहण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिलेल्या आहेत.

इंग्लंडमधून आलेल्यांपैकी 20 जण निगेटिव्ह असल्याचे तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे नगरकरांनी काळजी करण्याचे कारण नाही. तथापि, या व्यतिरिक्‍त युुरोपमधून कोणी आलेले असल्यास त्यांनी तत्काळ तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. तसेच अशा लोकांसंबंधी काही माहिती असल्यास राष्ट्रीय कर्तव्य म्हणून बाजूच्या लोकांनी जिल्हा प्रशासनाला अवगत करावे. विमानसेवा बंद असल्याने आता तशी शक्‍यता कमीच आहे. परंतु तरी देखील काळजी घेणे गरजेचे आहे.
डॉ. राजेंद्र भोसले
जिल्हाधिकारी, नगर.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.