मुंबई – लोकसभा निवडणुकात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता मंदावल्यामुळे शेअरबाजारात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच अमेरिका- चीन व्यापार मतभेद वाढले आहेत. या कारणामुळे गेल्या नऊ दिवसांपासून शेअरबाजाराचे निर्देशांक एकतर्फी कमी होत आहेत.
सोमवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 372 अंकांनी कोसळून 37,090 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 130 अंकांनी कोसळून 11, 148 अंकांवर बंद झाला. गेल्या नऊ दिवसात सेन्सेक्स तब्बल 1940 अंकांनी तर निफ्टी 599 अंकांनी कोसळला आहे. कंपन्यांचे ताळेबंद ही सुमार पद्धतीचे असल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळत नाही. सोमवारी आरोग्य, भांडवली वस्तू, ऊर्जा, तेल आणि नैसर्गिक वायू, वाहन, वीज, बॅंकिंग क्षेत्राचे निर्देशांक 3.53 टक्क्यांनी कोसळले. मात्र, रुपया घसरत असल्यामुळे सोमवारी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा निर्देशांक वाढला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप सोमवारी 2.15 टक्क्यांपर्यंत कोसळले.
भांडवल असुलभतेमुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअरबाजारातून अंग काढून घेत आहेत. या गुंतवणूकदारांनी सोमवारी 1056 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. मात्र, देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 1057 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. मात्र तरीही निर्देशांकांना आधार मिळू शकला नाही. रुपयाच्या मूल्यातही दुपारी 59 पैशांपर्यंत घट झाली होती. क्रुडचे दर सध्या वाढून 71.50 डॉलर प्रति पिंप या पातळीवर गेले आहेत.