लंडन : ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या नागरिकांना करोनाच्या साथीदरम्यान सर्वात वाईट फटका बसला आहे. संपूर्ण इंग्लंडमधील रुग्णालयांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या अधिकृत डाटाच्या आधारे हा निष्कर्श काढला जातो आहे.
इंग्लंडमधील “नॅशनल हेल्थ सर्व्हिस’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार 17 एप्रिलपर्यंत वेगवेगळ्य रुग्णालयांमध्ये मरण पावलेल्या 13,918 जणांपैकी 16.2 टक्के कृष्णवर्णीय, आशियाई आणि अल्पसंख्य वंशांच्या (बीएएमई) पार्श्वभुमीचे होते. या गटातील मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2,252 इतकी आहे. या वर्गवारीमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 3 टक्के (420 मृत्यू) इतके होते. त्यानंतर कॅरिबियन वंशाचे 2.9 टक्के (407 मृत्यू) आणि त्यानंतर 2.1 टक्के पाकिस्तानींचा (287 मृत्यू) क्रमांक लागतो.
ही आकडेवारी एकूण मृत्यूंच्या उपलब्ध माहितीच्या आधारे ढोबळमानाने टक्केवारी आहे. ब्रिटनच्या लोकसंख्येमध्ये कृष्णवर्णीय, आशियाई आणि अल्पसंख्यांक (बीएएमई) गटाची लोकसंख्या 13 टक्के आहे. त्यामुळे मृतांच्या आकडेवारीसंदर्भात अल्पसंख्यांक समुदायाच्या आकडेवारीत असमानता असल्याच्या आक्षेपामुळे ब्रिटीश सरकरने करोनाच्या मृत्यूंबाबतच्या माहितीचा फेरआढावा घेतला जाईल, अशी घोषणा केली आहे.