श्रीनगर – कुख्यात दहशतवादी आणि जैश ए महंमदचा प्रमुख मसूद अझहर याचा जवळचा नातेवाईकाचा समावेश आज सकाळी चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये होता. ही चकमक पुलवामा जिल्ह्यात घडली, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. त्याच्या साथिदाराचाही खात्मा करण्यात आला. मात्र त्याची ओळख पटू शकली नाही.
जैश ए महंमदचा कुख्यात दहशतवादी लंबू याला आज सकाळी कंठस्नान घालण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. महंमद इस्लाम अल्वी उर्फ लंबू हा अझहरच्या कुटुंबातील सदस्य होता. पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलावर 2019 मध्ये झालेल्या हल्ल्याचा कट रचण्यात त्याचा सहभाग होता.
या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 40 जवान मारले गेले होते. या प्रकरणात एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात त्याच्या नावाचा उल्लेख होता. नेगबारन-तरसर जंगलात पोलीस आणि लष्कराने रावलेल्या शोध मोहिमेवेळी ही चकमक उडाली. मिळालेल्या विश्वसनीय खबरीवरून या पथकाने या परिसराची नाकाबंदी केली आणि शोधमोहीम सुरू केली.
पोलिसांनी घेरल्याचे लक्षात येताच या दहशतवाद्यांनी ते लपलेल्या ठिकाणाहून बाहेर येत अंधाधूंद गोळीबार सुरू केला. त्यावेळी ही चकमक उडाली. काश्मिचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी लंबूला कंठस्नान घातल्याबद्दल लष्कर आणि पोलिसांचे अभिनंदन केले आहे.