नवी दिल्ली – देशातील करोनावरील लसीचे वाटप करण्याआधी दुसरी रंगीत तालीम शुक्रवारी घेण्यात येणार आहे. ही चाचणी देशांतील सर्व जिल्ह्यात एकाच वेळी घेण्यात येईल, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. दरम्यान, केरळमधील वाढत्या करोना बाधितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ केरळला राज्य सरकारच्या मदतीसाठी पाठवले आहे. गेल्या सात दिवसांत केरळमध्ये 35 हजार 38 बाधित नोंदवण्यात आले.
भारत बायोटेकने विकसित केलेली कोव्हॅक्सिन आणि सीरमने उत्पादित केलेली कोविशिल्ड या दोन लसींना भारताच्या औषध नियामकांनी मान्यता दिली आहे. त्याचे दहा दिवसांत लसीकरण सुरू करणार असून प्रौढांवर होणारे ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असेल, असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. त्या दृष्टीकोनातून ही दुसरी रंगीत तालीम घेण्यात येणार आहे.
यात सर्व जिल्ह्यात मेसेज पाठवून केंद्रावर बोलावून लसीकरणाची चाचणी घेण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. या देशव्यापी रंगीत तालमीमुळे लसीकरण अभियानात येणाऱ्या अडथळ्यांची कल्पना येऊ शकेल त्यावर प्रत्यक्ष मोहिमेवेळी ते अडथळे येऊ नयेत म्हणून नियोजन करता येईल, असे सूत्रांनी सांगितले.
देशातील स्थिती
करोनाच्या नव्या विषाणूची बाधा देशातील 71 जणांना झाली आहे हा विषाणू करोनाच्या या आधीच्या विषाणूपेक्षा 70 टक्के अधिक संसर्गजन्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. करोनाचे काल दिवसभरात 18 हजार 88 बाधित सापडले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या एक कोटी तीन लाख 74 हजार 932 झाली. तर काल 264 मृत्यू झाल्यामुळे करोना बाधितांची संख्या एक लाख 50 हजार 114 वर पोहोचली आहे. सक्रिय बाधितांची संख्या सलग चौथ्या दिवशी तीन लाखाच्या आत राहिली आहे.
जागतिक स्थिती
करोना साथीचे मूळ शोधण्यासाठी येणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्या शिष्टमंडळाला चीन व्हीसा देण्यास जाणीवपूर्वक विलंब करत आहे, असा आक्षेप जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी नोंदवला आहे. तर युरोपमधील दर 50 बाधितांपैकी एक आपल्या देशांत असल्याचे इंग्लंडने म्हटले आहे. जर्मनीने आपले लॉकडाऊन वाढवले असून इटलीने पुन्हा साथीचा धोका उद्भवू नये म्हणून निर्बंध वाढवले आहेत.