सरलेल्या आठवड्यात निर्देशांकांत मोठी वाढ

गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक मूल्यात सहा लाख कोटी रुपयांची भर

मुंबई – सरलेल्या आठवड्यात शेअरबाजार निर्देशांकांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली त्यामुळे या आठवड्यात गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे मूल्य मोठ्या प्रमाणात वाढले. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला लोकसभा निवडणुकात 353 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे हे सरकार आगामी काळात अर्थव्यवस्था मजबूत करेल अशी आशा गुंतवणूकदारांना वाटत आहे. 17 मे रोजी शेअरबाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे भांडवली मूल्य साधारणपणे 146 लाख कोटी होते ते आठवड्याच्या अखेर म्हणजे 24 मे रोजी 152.7 लाख कोटी रुपयांवर गेले.

19 फेब्रुवारीपासून शेअरबाजार निर्देशांकांत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. 19 फेब्रुवारीपासून आतापर्यंत गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक मूल्य 16.46 लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. याबाबत रेलिगेअर ब्रोकिंगचे वरिष्ठ अधिकारी जयंत मंगलिक यांनी सांगितले की, केंद्रात स्थिर आणि उद्योगासाठी अधिक काम करणारे सरकार आले आहे. त्यामुळे आगामी काळात सर्व क्षेत्राची उत्पादकता वाढून कंपन्यांचे नफे वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदार खरेदी करत आहे.

आता देशातील परिस्थिती उत्तम आहे. त्यामुळे निर्देशांकांवर परिणाम झाला तर परदेशातील परिस्थितीचा होण्याची शक्‍यता आहे. केंद्रात स्थिर सरकार येणार असल्यामुळे या आठवड्यात अनिश्‍चितता निर्देशांक 30.18 टक्‍क्‍यांवरून 16.46 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला. त्यामुळे भारताची परिस्थिती आता स्थिर असल्याचे समजले जात आहे. याचा फायदा संस्थागत गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासाठी होऊ शकणार आहे.

सॅमको या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिमित मोदी यांनी सांगितले की, आता गुंतवणूकदारांनी रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण जाहीर होईपर्यंत वाट पाहावी. त्याचबरोबर नवे सरकार कशा प्रकारचा अर्थसंकल्प सादर करते यावर निर्देशांकांची पुढील वाटचाल अवलंबून असणार आहे. सध्या निर्देशांक मूळातच आवश्‍यकतेपेक्षा जास्त पातळीवर आहेत. त्यामुळे आगामी काळात गुंतवणूकदार जास्त जोखीम घेणार नाहीत. खरोखरच उत्पादकता वाढणार असेल तरच निर्देशांकांत वाढ होण्याची शक्‍यता आहे, असे त्यानी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.