पुणे : मार्केट यार्डातील गुळ-भुसार विभाग सोमवारपासून सुरू होणार आहे. तर, तर मंगळवारपासून फळे-भाजीपाला विभाग सुरू होणार आहे. तर, फुलबाजार शुक्रवारपर्यंत (दि. 24) बंद राहणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी दिली. जिल्हा प्रशासानने दिलेल्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी 8 ते दुपारी 12 यावेळेत बाजाराचे कामकाज सुरु राहणार आहे.
वाढत्या करोना संसर्गाच्या परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या लॉकडाऊनमध्ये 14 एप्रिलपासून बाजार समितीचे हे सर्व बाजार बंद होते. त्यानंतर हे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फळे-भाजीपाला विभाग सकाळी सुरू असला तरीही शेतकऱ्यांना रात्री बाजारात शेतीमाल आणता येणार आहे. मांजरी, मोशी, खडकी, उत्तमनगर येथील भाजीपाल्याचे उपबाजार सुरू करण्यात येणार आहेत.
मोशी बाजार सोमवारपासून (20) सुरू होणार आहे. तर, उर्वरित तीन बाजार मंग़ळवारपासून सुरू होणार आहेत. बाजार सुरू करताना अडते, व्यापारी, कामगार संघटनांचे मत विचारात घेण्यात आले. मात्र, सध्याच्या परिस्थितीत प्रशासनाने बाजार सुरू करताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
सामाजिक अंतर पाळणे, गर्दी टाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे, मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. बाजार घटकातील सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.