पुणे : मार्केट यार्डातील भुसार विभाग सुरूच राहणार आहे. बाजार समिती, पोलीस प्रशासन, कामगार संघटना आणि दि पुना मर्चंट्स चेंबरच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला. मर्यादीत मालाची आवक, गर्दी होणार नाही याची दक्षता आणि सॅनीटायझर, मास्क आणि सोशल डिस्टेनिंगच्या उपाययोजनाकरून सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत हा बाजार सुरू राहणार असल्याचे बाजार समितीचे प्रशासक बी.जे. देशमुख यांनी सांगितले. मुख्य आवारातील फळ, भाजीपाला विभाग मात्र बंदच राहणार आहे.
मार्केट यार्ड लगत असलेल्या काही रहिवाशी भागात करोनाचे रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर भीती पसरल्याने कामावर न येण्याचा निर्णय कामगारांनी घेतला होता. या पार्श्वभूमीवर बाजार समिती प्रशासनाच्या वतीने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बाधित क्षेत्रातील लोक बाजार आवारात येणार नाहीत, याची उपाययोजना बाजार समिती आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. आडत्यांच्या वतीने बाधित क्षेत्रातील लोक दुकानात कामावर न ठेवण्याची दक्षता घेण्यात येणार आहे. बाजारात आवक मर्यादीत स्वरूपात ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून गर्दी होणार नाही. आडत्यांकडून दुकानात काम करणाऱ्या कामगारांना मास्क आणि सॅनिटायझर देण्यात येणार आहे. अशा आवश्यक सर्व उपाययोजना करून बाजार सुरू ठेवण्यात येणार आहे.
तर उपचारासाठी सांघिक जबाबदारी घेणार…
विमा उतरविण्याची कामगारांची मागणी आहे. याबाबतचा प्रस्ताव बाजार समिती प्रशासनाने पणन संचालकांकडे पाठविला आहे. सरकार त्यावर सकारात्मक असून, लवकरच निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. मात्र, तो निर्णय येईपर्यंत बाजार आवारातील एखादा व्यापारी अथवा कामगाराला करोनाचा प्रादुर्भाव झाला, तो बाजारातील म्हणजे कुटुंबातील घटक आहे, म्हणून त्याच्याकडे पाहिले जाईल. त्याच्या वैद्यकीय उपचार आणि तंदुरूस्तीसाठी सांघिकपणे जबाबदारी घेतली जाईल, असे बाजार समिती प्रशासनाचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी सांगितले.