भांबोली ग्रामपंचायतीने गावातच जिरवला कचरा

कंपोस्ट खत निर्मिती प्रक्रियेस प्रारंभ : कचरामुक्‍ती गावासाठी एक पाऊल पुढे ; बायोगॅस निर्मिती प्रकल्पही सुरू

शिंदे वासुली (वार्ताहर) – चाकण एमआयडीसी टप्पा दोनमधील गावांमध्ये कचरा व्यवस्थापनाचा प्रश्‍न बिकट होत असताना ग्रामपंचायत भांबोलीने गावाच्या हद्दीत असणाऱ्या कंपन्यांच्या सहकार्याने कचरा संकलन व कचरा विल्हेवाटीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. नुकतेच इंडॉस्पेस कंपनीच्या सीएसआर निधीतून कंपोस्ट खत निर्मिती प्रक्रिया करण्यासाठी बांधण्यात आलेल्या एमआरएफ शेड सुरू करण्यात आले.

यावेळी अनिल सिंग, किशोर माळी, सुजित वर्गीस, कमसीन शहानी, सार्थक तपस्वी, सरपंच सागर निखाडे, उपसरपंच देविदास राऊत, पोलीस पाटील दीपक राऊत, ग्रामपंचायत सदस्य भरत लांडगे, ललिता राऊत, अतुल निखाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संपत राऊत, मुरलीधर राऊत, शरद निखाडे, दशरथ पिंजण, आनंद निखाडे, ग्रामपंचायत कर्मचारी काळुराम राऊत, अविनाश राऊत, मल्हारी भाकर, निर्मला राऊत यांच्यासह परिसरातील शाळेतील विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीने ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. परंतु मोठ्या प्रमाणात संकलित होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया अधिक जलद व व्यापक स्वरुपात करुन कंपोस्ट खत निर्मितीसाठी कंपनीने सीएसआर फंडातून प्रकल्प शेड बांधून दिले आहे. त्यामुळे संपूर्ण भांबोली गाव कचरा शून्य करण्यासाठी हा प्रकल्प खूप महत्त्वपूर्ण असल्याचे सरपंच सागर निखाडे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नमिता भावे यांनी तर ग्रामसेवक काकासाहेब मिंड यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.