बैरूत – बैरूत येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या एका जबरदस्त स्फोटात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या प्रकरणावरून सरकारच्या विरोधात जनक्षोभ वाढल्यामुळे लेबनॉनच्या पंतप्रधानांनी आज आपला राजीनामा सादर केला.
4 ऑगस्ट रोजी झालेल्या या स्फोटात 160 जण मरण पावले, तर 6 हजारांहून अधिक लोक जखमी झाले होते. या घटनेवरून लोकांची सरकारच्या विरोधात व्यापक निदर्शने सुरू झाली होती. याच पार्श्वभूमीवर तीन मंत्र्यांनीही आधी राजीनामे दिल्यानंतर आज पंतप्रधान हसन दियाब यांनी आपले सरकारच राजीनामा देत आहे अशी घोषणा दूरचित्रवाणीवरील भाषणात केली.
गेले तीन दिवस लेबनॉन संसदेच्या परिसरात नागरिकांची निदर्शने सुरू आहेत. त्याही आधीपासून लेबनॉनच्या सरकारमधील अकार्यक्षमता, वाढलेला भ्रष्टाचार या प्रकारांवरून सरकारच्या विरोधात असंतोष होताच.
तो आता अधिकच वाढल्याने सरकारवर ही वेळ आली असे सांगितले जात आहे. देशात भ्रष्टाचार वाढल्याची कबुलीही पंतप्रधानांनी या भाषणात दिली. ते म्हणाले की ज्या ठिकाणी हा स्फोट झाला त्या ठिकाणी गेल्या सात वर्षांपासून हा स्फोटकांचा साठा ठेवण्यात आला होता.
हा प्रकार भ्रष्ट लोकांमुळेच घडू शकला आहे असेही त्यांनी नमूद केले. आपल्याला या भ्रष्टाचाराच्या महासमस्येचा मुकाबला करण्यात अपयश आले असल्याचे हताश उद्गारही त्यांनी यावेळी काढले.