मेलबर्न – जागतिक टेनिस क्षेत्रात बॅड बॉय म्हणून ओळखला जाणारा ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गीओसचे वर्तन ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतही पहायला मिळाले. घरच्या मैदानावर खेळत असताना व सामन्यात विजय मिळवतानाही त्याचे नखरे सुरूच होते. रागाच्या भरात रॅकेट फेकणे, अंडर आर्म सर्व्हिस करणे आणि पंचाकडे पाहत जोरात ओरडणे असे अत्यंत अखिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करता येईल ते किर्गीओसने केले. संघर्षपूर्ण लढतीत त्याने तिसरी फेरी गाठली. मात्र, तरीही त्याच्या वर्तनुारून आयोजकांवरटीकासुरू झाली आहे.
करोनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार हाताचे अंतर राखून असलेल्या प्रेक्षकांची किर्गीओसने विक्षिप्त वागणूक दर्शवली. त्याने फ्रान्सच्या उगो हम्बर्टविरुद्धची लढत 5-7, 6-4, 3-6, 7-6(7-2), 6-4 अशी 3 तास 25 मिनिटांनंतर जिंकली. आता त्याच्यापुढे तिसऱ्या मानांकित डॉमिनिक थिमचे आव्हान असेल.
हम्बर्गने पहिलाच सेट जिंकल्यावर किर्गीओसने निराशेच्या भरात आपली रॅकेट फेकून दिली. यातून स्वतःला सावरत त्याने दुसऱ्या सेटला तिसऱ्या गेमला हम्बर्गची सर्व्हिस ब्रेक तिसरा सेट पुन्हा गमावल्यावर किर्गीओसने आपली रॅकेट तोडली. यामुळे त्याला पंचांकडून ताकिद देण्यात आली.
चौथ्या सेटलाही हॅम्बर्गने किर्गीओसची सर्व्हिस ब्रेक करत विजयाकडे भक्कम पाऊल टाकले. पण, किर्गीओसने दोन मॅचपॉइंट वाचवत बरोबरी साधली आणि टायब्रेकमध्ये सेट जिंकला. पाचव्या सेटला सगळे सुरळीत असताना मध्येच त्याने अंडरआर्म सर्व्हिस करून पुन्हा वाद ओढवून घेतला. अर्थात, त्यानंतर कमालीचा आक्रमक खेळ करत त्याने तिसऱ्या गेमला ब्रेकची संधी साधून मिळविलेली आघाडी टिकवत विजय मिळविला.
अन्य लढतींमध्ये जर्मनीच्या ऍलेक्झांडर झ्वेरेव यानेही तिसरी फेरी गाठली. त्याने अमेरिकेच्या मॅक्सिम क्रेसी याचा 7-5, 6-4, 6-3 असा पराभव केला. महिलांच्या गटात तिसऱ्या मानांकित नाओमी ओसाका हिने फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सिया हिला 61 मिनिटांत 6-2, 6-3 असे पराभूत केले. दोनवेळची ग्रॅंड स्लॅम विजेती सिमोना हालेप थोडक्यात बचावली. अल्जा टॉमयानोविच हिने तिला कडवा प्रतिकार केला. निर्णायक सेटमध्ये 2-5 अशी पिछाडीवर असताना हालेप हिने सलग पाच गेम जिंकून विजय मिळविला. तिने ही लढत 6-4, 4-7, 7-5 अशी जिंकली. सेरेना विल्यम्स हिनेही आपला झंझावात कायम राखताना निना स्टोयानोविच हिचा 6-3, 6-0 असा पराभव केला.
आठ वर्षांनी ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत पुनरागमन करणाऱ्या कॅनडाच्या रिबेका मारिनो हिला दुसऱ्या फेरीत आव्हान गमवावे लागले. चेक प्रजासत्ताकच्या मार्केटा व्होंड्रोउसोवा हिने 6-1, 7-5 असे पराभूत केले.
गतविजेती केनिन पराभूत
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची अमेरिकेची गतविजेती सोफिया केनिन हिचे या वेळी स्पर्धेतील आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले. जागतिक क्रमवारीत 65 व्या स्थानावर असणाऱ्या इस्टोनियाच्या अनुभवी काया कानेपी हिने तिचा 6-3, 6-2 असा पराभव केला. केनिनने गतवर्षी या स्पर्धेत विजेतेपद मिळवून सर्वांना चकित केले होते. पाठोपाठ तिने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचीही अंतिम फेरी गाठली होती. या वेळी मात्र 64 मिनिटांच्या लढतीत ती साफ निष्प्रभ ठरली.