‘या’ देशात कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेला सुरुवात; 32 प्रांत रेड झोन घोषित

तेहरान – इराणमध्ये कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. पुन्हा संसर्ग पसरण्याची लक्षणे दिसायला लागल्याने राजधानी तेहरानसह 32 प्रांतांमध्ये रेड झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. नव्याने संसर्गाची लक्षणे दिसायला लागल्याचे इराणमध्ये अलिकडेच लक्षात येऊ लागले आहे. रविवारी एकाच दिवसात संपूर्ण देशभरात 195 नवीन करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.

त्यामुळे इराणमध्ये करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची एकूण संख्या 25 हजार 589 इतकी झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात इराणमध्ये करोनाची साथ पसरायला लागल्यापासून एका दिवसात सापडणाऱ्या रुग्णांची संख्याही प्रथमच 3,500 च्याही पुढे गेली आहे. तर दिवसभरात मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही प्रथमच 200 च्या पुढे गेली आहे.

नागरिकांनी करोनाबाबत अजिबात निष्काळजी राहू नये, असे इराणमधील सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खोमेनी यांनी गेल्या आठवड्यात टिव्हीवरून नागरिकांना उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले होते. खोमेनी आणि इराणचे अध्यक्ष हसन रौहानी यांनी जनतेला कोविड-19 शी संबंधित सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याची सूचना केली आहे.

इराणमध्ये या वर्षी फेब्रुवारीमध्ये करोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या सुमारास करोनाच्या साथीची दुसरी लाट नोंदवली गेली होती. त्यानंतर मात्र करोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.