लोकांच्या प्रेमाने गजबजलेल्या उदयनराजे पर्वाचा नवा अध्याय सुरू

श्रीकांत कात्रे

अखेर सातारा मतदारसंघातून एक लाख 26 हजारांहून अधिक मताधिक्‍य घेऊन उदयनराजे भोसले यांनी विजयाची हॅटट्रिक करीत राष्ट्रवादी कॉग्रेसचा बालेकिल्ला टिकविला. मतांच्या आकडेवारीवरून आणखी खूप चर्चा सुरू आहे. पण विजयाचे शिक्कामोर्तब महत्त्वाचे असते, ते झाले आहे. राजकारणात वर्चस्व महत्त्वाचे असते. राष्ट्रवादी कॉंग्रेसने उदयनराजेंच्या रूपाने ते वाढविले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ती जमेची बाजू ठरली असली तरी गाफिल राहून उपयोग नाही, अशी परिस्थिती आहे. कारण युतीतील पक्षांनीही केलेली कामगिरी दुर्लक्ष करण्यासारखी नाही. विशेषतः भारतीय जनता पक्षाने केलेली व्यूहरचना पाहिली की ऐन युद्धाच्या वेळी त्यांचे डावपेच यशस्वी होऊ शकतात, याचा अनुभव लोकसभेच्या वेळी माढ्यासारख्या मतदारसंघानेही घेतला आहे. उदयनराजेंचा विजय पक्षाची ताकद वाढविणारा ठरू शकतो. परंतु त्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्नांची गरज आहे, हे निश्‍चित आहे. अन्यथा भाजप- शिवसेना या जिल्ह्यात कायमस्वरूपी वरचष्मा मिळवेल, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही.

कोणतीही गोष्ट सहजसाध्य नसते. कष्ट, मेहनत, परिश्रम, लोकसंपर्क याबरोबरच संघर्ष केल्याशिवाय यश सहजासहजी पदरात पडत नाही. उदयनराजेंचे यश तसेच आहे. त्यांनी संघर्षांतून केलेली वाटचाल विसरता येत नाही. उदयनराजे म्हणतील तीच दिशा असे दिवस सध्या दिसत आहेत. त्यांच्या राजकारणाचा प्रवास पाहिला तर लोकांच्या मनात स्थान मिळविण्यासाठी त्यांना झगडावे लागले आहे. शिवछत्रपतींच्या घराण्याचे वलय लाभलेल्या उदयनराजेंच्या प्रतिमेचे कोडे अनेकांच्या मनात असते. आजही त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो लोक दिसतात. त्याचप्रमाणे त्यांना विरोध करणारेही कमी नाहीत. काही तत्त्वाने विरोधक आहेत.

सार्वजनिक कामांची अपेक्षापूर्ती न झाल्याने काही वेळा विरोध होतो. हितसंबंध साधत नसल्याने काही विरोधात जातात. पण विरोधकांपेक्षाही प्रेम करणारेच अधिक आहेत, हे या निकालाने सिद्ध केले आहे. उदयनराजे असे का वागतात, असा प्रश्‍नही अनेकांना पडतो. कोणत्या वेळी कसे वागायचे याचेही त्यांचे सूत्र इतर कोणत्याही राजकीय नेत्यांकडे आढळत नाही. कधी एखाद्यावर टीका करतील तर कधी त्याच्याशी प्रेमाने संवाद साधतील. सर्वसामान्य माणसांत मिसळून त्यांना आपलेसे करण्याचा गुण त्यांच्याकडे आहे. त्यासाठी ते कधीही कुणाच्या घरी जातील, तिथेच दोन घास खातील. गरीब कष्टकऱ्याची कणव कधी दाटून येईल तेही सांगता येत नाही. रस्त्यावरील विक्रेत्याकडची सगळी फळे खरेदी करतील. लोकांना वाटून टाकतील. कुठे अन्याय झाल्याचे समजले तर काळ वेळ न पाहता धावून जातील. राजकीय नेत्यांशी वेगळ्या पद्धतीने बोलतील. कुणीही कितीही मोठा असला तरी चूक झाल्यावर आडवे करायला मागेपुढे पाहणार नाहीत. कार्यकर्त्यांना प्रेमानही वागवतील आणि उभेही करणार नाहीत.

अशा विरोधाभासी स्वभावाचे सगळे कंगोरे त्यांच्यात दिसतात. म्हणूनच त्यांना समजावून घेणे तेव्हढे सोपे नाही. मतदानाच्या आकडेवारीची चर्चा करतानाही अशाच स्वभावाच्या पैलूंचे दर्शन घडू शकते. टीका होते, विरोध होतो आणि त्याच्यापेक्षा अधिक प्रेमही मिळते. त्याचे कारण त्यांच्या जगण्यातील चढउतारांमध्ये आहे. राजघराणे म्हणून प्रेम जसे त्यांना लाभले, तसेच अनेकदा टोकाचा संघर्षही त्यांना करावा लागला. त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरवातही जयपराजय एकाच वेळी अनुभवण्याची ठरली. 1991 च्या नगरपालिका निवडणुकीत त्यांनी एका वार्डातून विजय मिळविला होता. दुसऱ्या वॉर्डातून पराभव. त्यामुळेच की काय पण जय- पराजयापेक्षाही लोकांचे प्रेम मिळणे त्यांना महत्त्वाचे वाटत राहते. पक्षापेक्षाही माझ्यामागे प्रेम करणारी माणसे आहेत, अशी त्यांची भूमिका बनली ती त्यामुळेच.
नगरपालिकेतील कारकीर्दीपासून सुरू झालेला संघर्ष त्यांना सातत्याने करावा लागला.

गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यामुळे उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला तो काळ तर अधिक संघर्षमय होता. संघर्षाबरोबरच सत्तेच्या पायऱ्या चढण्याची सुरवातही त्यावेळीच झाली. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद मिळाले. सातारा विधानसभा मतदारसंघातील 1998 च्या पोटनिवडणुकीत विजय मिळवताच राज्याचे महसूल राज्यमंत्रिपद मिळाले. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांच्यावर खुनाचा आरोप झाला. त्यातून ते निर्दोष मुक्त झाले. पण या संघर्षानंतर मात्र उदयनराजेंनी मागे वळून पाहिले नाही. भाजप सोडून ते काही काळ कॉंग्रेसमध्येही गेले. लोकसभेच्या 2009 च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी जिल्ह्यातून भूमाता दिंडी काढून जिल्ह्याचे वातावरण “उदयनराजेमय’ करून टाकले.

एखाद्या कसलेल्या राजकीय मुत्सद्‌द्‌याची ती चाल ठरली. त्यांच्या दिंडीची दखल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना घ्यावी लागली. आणि राष्ट्रवादीची उमेदवारी त्यांना मिळाली. तेथून पुढे सुरू झालेला त्यांचा प्रवास हा फक्त त्यांचाच ठरला. उदयनराजे सांगतील ती पूर्व दिशा असे होत गेले. 2014 च्या मोदी लाटेतही देशभरात उदयनराजेंचा करिष्माच वेगळा ठरला. मोठ्या मताधिक्‍क्‍याने ते विजयी झाले. खासदार म्हणून दहा वर्षांत उदयनराजेंचा प्रभाव वाढत असला तरी संघर्षांची परंपरा संपली नाही. यावेळच्या निवडणुकीपूर्वी त्यांना पक्षांतर्गत संघर्षाला तोंड द्यावे लागले. पक्षातील आमदारांनीच त्यांना उमेदवारी देण्यास विरोध केला. अखेर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच दिलजमाईचा तोडगा काढला. त्यामंळेच राष्ट्रवादी आमदारांच्या चारही मतदारसंघांत मताधिक्‍य घेत त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.
उदयनराजे विजयी झाले. पण प्रश्‍न संपलेले नाहीत. त्यांच्याविषयीच्या नकारात्मक प्रश्‍नांची उत्तरे मिळालेली नाहीत. तरीही उदयनराजे विजयी कसे होतात, असाच प्रश्‍न पुन्हा पडल्याशिवाय राहत नाही. ते संसदेच्या कामकाजात कमी सहभागी होतात. संसदेत प्रश्‍न विचारत नाहीत.

जिल्ह्याच्या सर्व भागात संपर्क करीत नाहीत. विकास कामे व मोठा प्रकल्प आणण्याकडे लक्ष देत नाहीत. औद्योगिक विकासासाठी भूमिका घेत नाहीत. बेरोजगारीच्या प्रश्‍नाला उत्तर शोधत नाहीत. अशा अनेक प्रश्‍नांची सरबत्ती निवडणुकीपूर्वी विचारली जात होती. तरीही उदयनराजेच विजयी होतात. त्याचे कारण फक्त उदयनराजे हेच आहे. ते उदयनराजे आहेत. जीवाला जीव देणारे कार्यकर्तेही आहेतच. आणि सर्वसामान्य माणसांच्या मनांतही ते रूजले आहेत. गॉडफादर किंवा पक्ष, नेतेमंडळी यापेक्षाही माणसांचे प्रेम त्यांच्यासाठी नेहमीच वरचढ ठरते. काहीही चर्चा होऊ देत. कितीही नकारात्मक बाबी पुढे आल्या तरी या निवडणुकीतही तेच झाले.

उदयनराजे विजयी झाले. नेता, पक्ष कोणताही निर्णय घेऊ देत, देशभरात काहीही होऊ दे, इथे फक्त उदयनराजेंचेच पर्व आहे. या पर्वाचा आता नवीन अध्याय सुरू होतोय. नकारात्मक प्रश्‍नांची उत्तरे पुढील काळात मिळतील, या अपेक्षेसह इथला माणूस त्यांच्यावर प्रेम करीत राहिल, यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काही नाही. देशभरात वलय आहे. लोकांचे प्रेम आहे. त्यामुळेच या पर्वाच्या नव्या अध्यायात सकारात्मक विकासाला चालना देण्यासाठीच लोकांनी त्यांच्यावर विश्‍वास व्यक्त केला असावा. त्यासाठीच ते आताही ते मागे राहणार नाहीत, हीच आशा या निकालाने सर्वांच्या मनात निश्‍चितपणे जागवली आहे.

त्यांचा पक्ष… लोकांचा पक्ष !

उदयनराजे ज्या पक्षात तो पक्ष मोठा हे समीकरण सर्वांनीच अनुभवले आहे. त्यांची पक्षीय कारकीर्द भाजपमधून सुरू झाली. भाजपची फार मोठी ताकद नव्हती त्यावेळी उदयनराजेंचा पक्षप्रवेश झाला. उदयनराजेंनी सातारा विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळविला. त्यावेळी जिल्ह्याच्या सत्तास्थानाच्या नकाशावर भाजप आला. आता ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आहेत. ही राष्ट्रवादीची जमेची बाजू ठरली आहे. निवडणूक आली की सर्वच पक्षांना उदयनराजे हवे असतात. उदयनराजेही सर्वच पक्षांबरोबर सलोख्याचे संबंध ठेवतात. सर्व पक्षांच्या खुर्च्या एकावर एक मांडून त्यांनी आपण सर्व पक्षांचे आहोत, असे सांगितले होते. दुसऱ्या बाजूला आपण कोणत्याच पक्षाचे नाही आपण लोकांच्या पक्षाचे आहोत, हे सांगण्यासही ते विसरत नाहीत. त्यामुळेच पक्षांना आणि प्रमुख नेत्यांनाही उदयनराजेंच्या स्वभावाचा थांगपत्ता लागत नाही. सर्वच पक्षांतील नेत्यांशी चांगले नाते जोडल्यामुळे राजकारणात योग्यवेळी अनेकांना संभ्रमात पाडून हवे ते साध्य करण्याची किमयाही त्यांनी दाखवली आहे. आता जिल्ह्याच्या विकासासाठी याच नात्यांचा उपयोग त्यांनी करावा, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.