कोल्हापूर – (प्रतिनिधी): गाय दुधाला प्रति लिटर पाच रुपये आणि दूध पावडर प्रति किलोला 50 रुपये शासनाने अनुदान द्यावे यासह अन्य मागण्यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला आज कोल्हापूर जिल्ह्यात सुरवात झाली आहे.
पहाटेपासूनच पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून धावणाऱ्या दुधाच्या टँकरला अडवून दूध रस्त्यावरती सोडण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो आणि दुधाला चांगला भाव मिळालाच पाहिजे अशा घोषणाही दिल्या तर दुसरीकडे कोल्हापूरच्या ग्रामीण भागात देखील स्वाभिमानीच्या आंदोलनाने चांगलाच उठाव केला असून कागल कोल्हापूर-गारगोटी मार्गावर बिद्री परिसरात देखील दुधाचे भरलेले कॅन वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवून दूध अक्षरशहा रस्त्यावरती करण्यात आले आहे.