“कमळाच्या फुलातील भुंगा म्हणजे मियाँ ओवेसी”; शिवसेनेचा भाजपावर पुन्हा निशाणा

मुंबई : राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात रोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून शाब्दिक युद्ध होताना दिसत आहे. त्यातच खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षावर सातत्याने भाजपाची बी टीम असल्याचा आरोप राजकीय वर्तुळातून होत असतो. भाजपाविरोधी पक्षाकडून केल्या जाणाऱ्या या आरोपाला भाजपा खासदाराने अप्रत्यक्षपणे दुजोरा दिल्याने हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यावरून शिवसेनेने भाजपा नेतृत्वासह असदुद्दीन ओवेसी यांना खडेबोल सुनावले आहेत.

“ओवेसी यांनी बिहारमध्ये भाजपाची मदत केली. आता पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातही तसंच होईल,” असं विधान भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी केलं होतं. साक्षी महाराज यांच्या विधानाचा हवाला देत शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपा नेतृत्वासह असदुद्दीन ओवेसी यांच्यावर निशाणा साधला आहे.

“ओवेसी साहेबांची पोलखोल भारतीय जनता पक्षानेच केल्याने काही प्रमाणात दूध का दूध आणि पानी का पानी झाले आहे. ओवेसी मियाँचे ‘एमआयएम’ पात्र हे मुसलमानांचे तारणहार नसून, भारतीय जनता पक्षाचे अंगवस्त्र असल्याच्या शंका लोकांना होत्याच, पण भाजपाचे प्रमुख नेते साक्षी महाराज यांनी आता ठणकावून खरे सांगितले आहे की, ”होय, मियाँ ओवेसी हे भाजपाचेच पोलिटिकल एजंट असून ओवेसीच्या मदतीनेच आम्ही निवडणुका जिंकत असतो.”

साक्षी महाराज म्हणतात, ‘ओवेसी मदतीला होते म्हणून आम्ही बिहार जिंकले. आता ओवेसीसाहेब आम्हाला प. बंगाल आणि उत्तर प्रदेशातही मदत करतील. ओवेसींची मदत भाजपास होते ही भगवंताचीच कृपा आहे. परवरदिगार भगवंत ओवेसींना अधिकाअधिक शक्तिमान करो!’ साक्षी महाराजांनी भाजपाचे अंतरंगच उघडून दाखवले. कमळाच्या फुलातील कुंजबिहारी हे अटलबिहारी वाजपेयी, दीनदयाल उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी, आडवाणी, मोदी, अमित शहा असावेत या भ्रमातून साक्षी महाराजांनी लोकांना बाहेर काढून कमळाच्या फुलातील भुंगा म्हणजे मियाँ ओवेसी आहेत हेच दाखवले आहे,” असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला आहे.

” मुसलमानांची मते ‘सेक्युलर’छाप राजद, समाजवादी पार्टी किंवा काँग्रेसकडे जाऊ नयेत, त्यांना ही हुकमी मते मिळू नयेत यासाठी मियाँ ओवेसी यांचा पद्धतशीर वापर केला जातो. बिहारच्या निकालानंतर हे स्पष्टच झाले. राष्ट्रीय लोकदल, काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी ओवेसींवर गंभीर आरोप केले आहेत. मुस्लिम वोट बँक कापून भाजपास फायदा व्हावा यासाठीच मियाँ ओवेसी यांची धडपड असल्याचा आरोप हे लोक करीत होते तोपर्यंत ठीक होते, पण आता भाजपाच्या गोटातूनही तेच टोले जाहीरपणे लगावले गेले आहेत.

प. बंगालात मियाँ ओवेसी यांनी जे कार्य सुरू केले आहे, त्यामुळे भाजपाचे चेहरे आनंदाने फुलू लागले आहेत. ओवेसी यांच्या सहकार्याने भाजपास बंगाल जिंकायचा आहे. म्हणजे हिंदुत्वविरोधी शक्तीचा वापर करूनच हिंदुत्वाचा जयजयकार करायचा आहे,” असा टोला शिवसेनेनं भाजपाला लगावला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.