मुंबई – डेक्कन चार्जर्सविरुद्धचा करार मुदतीपूर्वीच रद्द केल्याने उच्च न्यायालयाच्या लवादाने बीसीसीआयला 4 हजार 800 कोटींचा दंड केला होता. लवादाच्या या निर्णयाविरोधात आता बीसीसीआय उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे.
2012 साली बीसीसीआयने हिशेबातील अनियमितता असल्याचे मत व्यक्त करत डेक्कन चार्जर्स संघाचा करार मोडीत आणला होता. त्या विरोधात संघाने न्यायालयात आव्हान दिले होते. शुक्रवारी याचा निकाल देताना लवादाने बीसीसीआयला दंड केला होता. आता निकालाची प्रत हाती आल्यावर पुढील निर्णय घेतला जाईल, असे सांगत बीसीसीआयने लवादाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.
लवादाने केलेल्या दंडाची रक्कम येत्या वर्षाअखेरपर्यंतच्या मुदतीची असून त्यांना हा दंड भरावाच लागणार आहे. मात्र, आता त्यांनी या निर्णयाला आव्हान देण्याचे संकेत दिल्याने त्यांना याचिका दाखल करण्यासाठी व त्यानंतरच्या फेरसुनावणीसाठी वेळ मिळणार आहे, अशी माहिती बीसीसीआयचे हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारी हेमांग अमीन यांनी दिली आहे.