कोहलीबाबतचा दावा बीसीसीआयने फेटाळला

मुंबई – दुहेरी हितसंबंधांबाबत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीबाबत मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे सदस्य संजीव गुप्ता यांनी केलेला दावा बीसीसीआयने फेटाळला आहे. तसेच गुप्ता यांनी गेल्या काही वर्षांपासून प्रमुख खेळाडूंना लक्ष्य करणे हे ब्लॅकमेलिंग असल्याची टीकाही बीसीसीआयने केली आहे.

गुप्ता यांनी गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेटमधील मोठ्या खेळाडूंना सातत्याने लक्ष्य केले आहे. विनाकारण त्यांच्याविरुद्ध आर्थिक हितसंबंधांचे मुद्दे काढले आहेत. तसेच बीसीसीआयच्या नियमांचा आधार घेत या खेळाडूंनी एकाच वेळी दोन पदांवर न राहता एका पदाचा राजीनामा द्यावा, अशाही मागण्या केल्या आहेत. त्यामुळे गुप्ता यांचा हेतू ब्लॅकमेलिंगचा वाटतो. त्यांना जर लोढा समितीच्या नियमांच्या कक्षेत खेळाडूंनी राहावे असे वाटत होते तर त्यांनी बीसीसीआयकडे पाठपुरावा करायला हवा होता. मात्र, त्यांनी वेळोवेळी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यामुळेच त्यांच्या हेतूबाबतच शंका आहे. ज्या खेळाडूंनी देशासाठी अत्यंत प्रामाणिकपणे कामगिरी केली, देशसेवा केली त्यांना बदनाम करण्याचाच हा गुप्ता यांचा डाव आहे, असे बीसीसीआयने म्हटले आहे.

कोहली हा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आहे आणि त्याचवेळी कॉर्नरस्टोन वेंचर्स पार्टनर्स एलएलपी या कंपनीचा संचालकही आहे. बीसीसीआयच्या नियमांनुसार एका व्यक्‍तीला एकापेक्षा अधिक पदे भूषवता येत नाहीत त्यामुळे कोहलीने एका पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही गुप्ता यांनी केली आहे. त्याचबरोबर कोहली स्पोर्टस्‌ एलएलपी या कंपनीत सहसंचालक म्हणूनही कार्यरत आहे, असेही गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

गुप्ता यांनी कोहलीवर हितसंबंधांचा ठपका ठेवला असून माझ्याकडे कोहलीविषयी तक्रार करण्यात आली आहे. त्याबाबत चौकशी केल्यानंतर पुढील निर्णय घेऊ. तसेच याबाबत आवश्‍यकता वाटली तर कोहलीला आपली बाजू मांडण्याची सूचना करु, बीसीसीआयचे नीती अधिकारी डी. के. जैन यांनी सांगितले आहे.

बीसीसीआयचा आयसीसीला इशारा ..

ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्‍वकरंडक तसेच आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. यावरून आता बीसीसीआय आक्रमक झाली आहे. तुम्ही काय तो निर्णय घ्या, आम्ही आमचा निर्णय जाहीर करू, अशा शब्दांत बीसीसीआयने आयसीसीला फटकारले आहे. तसेच पुढील मोसमातील सर्व मालिकांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात येईल, असेही सूचित केले आहे. टी-20 विश्‍वकरंडकाबाबत दोन बैठका होऊनही कोणताही निर्णय घेत नसल्यामुळे बीसीसीआयने संताप व्यक्‍त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.