सरावाबाबत बीसीसीआय अद्याप संभ्रमात

मुंबई – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेटपटूंसाठी सराव शिबिराचे आयोजन करणार असल्याचे जाहीर केले असले तरीही याबाबत सरकार परवानगी देणार का असा प्रश्‍न पडलेला असल्याने अद्याप संभ्रम कायम राहिला आहे.

देशात करोनाचा धोका वाढल्याने मार्च महिन्यातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका रद्द करण्यात आली. त्यानंतर आयपीएल स्पर्धा अनिश्‍चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आली. आता देशात लॉकडाऊन असताना तसेच करोनाचा धोकाही कायम असताना केंद्र सरकारने काही सवलती दिल्या आहेत. देशातील मैदाने व क्रीडा संकुले खुली करण्यात आली असली तरी क्रिकेटपटूंचे सराव सांघिकपणे सुरु करण्यात आलेले नाहीत. संघातील काही खेळाडू वैयक्तिक पातळीवर सराव करत असले तरीही अद्याप सांघिक सरावाला केंद्र सरकारने परवानगी दिलेली नाही.

याबाबत बीसीसीआयसह मुंबई क्रिकेट संघटनेने देखील पत्र व्यवहार केले आहेत. मात्र, अद्याप त्याबाबत सरकारकडून काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. भारतीय संघाचे तसेच देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळत असलेल्या क्रिकेटपटूंचे सराव शिबिर येत्या ऑगस्टमध्ये सुरु करण्यात येणार असे जाहीर केलेल्या बीसीसीआयने आता एक पाऊल मागे घेतले आहे. अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही याबाबत कानावर हात ठेवले असून सराव कधी सुरू होणार हे ठरलेले नाही, असे सांगत माध्यमांची बोळवण केली.

Leave A Reply

Your email address will not be published.