पिंपरी – सव्वा महिन्यांपूर्वी अपघातात जखमी झालेले पत्रकार प्रसाद गजानन गोसावी यांचे रविवार दि. १ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्याच्या मृत्यूनंतर काही तासातच त्याच्या हृदयाचे दुसऱ्या एका लष्करी जवानाच्या शरीरात यशस्वीपणे प्रत्यारोपण करण्यात आले. तसेच दोन फुफ्फुसे (lungs), यकृत (liver), व एक मूत्रपिंड (kidney) व दोन डोळे या अवयवांचेही दान करण्यात आले. त्यामुळे एकूण पाच रुग्णांना नवीन जीवन मिळाले.
प्रसाद गोसावी यांच्या दुचाकीला सव्वा महिन्यांपूर्वी ऑफिसमधून घरी येत असताना खडकी रेल्वे स्टेशनजवळ अपघात झाला होता. त्याच्यावर निगडीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. प्रकृती सुधारत असतानाच अचानक मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याची शुद्ध हरपली. अखेर डॉक्टरांनी प्रसाद ब्रेनडेड झाल्याचे घोषित केल्याने प्रसाद यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. पण या परिस्थितीत त्यांनी प्रसादचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. प्रसादचे डोळे, हृदय, दोन फुप्फुसे, यकृत एक किडनी हे अवयव काढून घेण्यात आले.
प्रसादचे हृदय नेण्यासाठी पिंपरीपासून पुण्यापर्यंत ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला होता. हृदय पुण्याच्या सदर्न कमांड हॉस्पिटलमध्ये नेऊन त्या ठिकाणी एका जवानावर हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. अवयवदानानंतर त्याच्यावर निगडीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रसाद आज या जगात नसले तरीही त्याचे हृदय अजूनही धडधडत आहे. भविष्यात एखाद्याला त्याच्या डोळ्यांनी हे जग पाहता येणार आहे. यकृत, फुप्फुसे व किडनी मिळाल्यामुळे इतर रुग्णांना नवजीवन मिळणार आहे.