वॉशिंग्टन : अमेरिकेत बंदूक संस्कृती इतकी फोफावली आहे की, रोज सरासरी 111 अमेरिकी नागरिक गोळीबारात मरण पावतात, 200 जखमी होतात. एव्हरीटाऊन रिसर्च अँड पॉलिसी या थिंक टँकने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
बंदुकीच्या हिंसाचाराचा एकूण अमेरिकी समाजावर आणि बळींच्या कुटुंबियांवर प्रतिकूल परिणाम होतो. दुर्दैवाने या हिंसाचारात अनेक निष्पाप जीवांचेही बळी जातात. असे असूनही गोळीबाराचे प्रकार कमी होण्याचे नाव घेत नाही. मागील महिन्यात शिकागोतील हाईलँड पार्क या उपनगरात स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाच्यावेळी असाच अंदाधुंद गोळीबाराचा प्रकार घडला आणि त्यामध्ये सात निष्पाप जीवांचा बळी गेला, 37 जण जखमी झाले. चालू वर्षात समूहावर गोळीबार करण्याच्या 309 घटना घडल्या असून त्यापैकी 15 घटनांमध्ये नागरिकांचे बळी गेले आहेत. अशा अंदाधुंद गोळीबारात निष्पाप लोकांचा मृत्यू होण्याची हाईलँड पार्कमधील घटना या वर्षातील चौथी घटना आहे.
समूहावर अंदाधुंद गोळीबार करण्याच्या घटना दरवर्षी वाढत आहेत. 2020 मध्ये अशा 610 घटना घडल्या तर 2021 मध्ये ही संख्या 692 वर पोचली. यामागील गांभीर्य लक्षात घेऊन असाल्ट रायफलवर बंदी घालणारे विधेयक अमेरिकेच्या काँग्रेसमधील (संसद) लोक प्रतिनिधीगृहाने मंजूर केले आहे. वरिष्ठ सभागृहाने म्हणजेच सिनेटकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्याला अधिकृतपणे कायद्याचे रुप येईल.
अमेरिकेची राज्यघटना जितकी जुनी आहे तितकाच त्या देशातील बंदूक संस्कृतीचा इतिहास जुना आहे. 1791 मध्ये अमेरिकेच्या घटनेत दुसरी घटना दुरुस्ती करून अमेरिकी नागरिकांना शस्त्रे बाळगण्याचा हक्क देण्यात आला. भारतात बंदूक बाळगण्यासाठी सरकारकडून रितसर परवाना घ्यावा लागतो. अमेरिकेत असा कोणताही परवाना घेण्याची गरज नाही. भारतात विनापरवाना बंदूक बाळगणे गंभीर गुन्हा समजला जातो, अमेरिकेत मात्र अशा परवान्याची कुठलीही गरज पडत नाही. अमेरिकेत बंदूक आणि शस्त्र उत्पादकांची लॉबी अतिशय प्रभावी आहे. त्यामुळे रोज सरासरी 111 जणांचा गोळीबारात मृत्यू होतो तरीही तेथील संसदेने याविरोधात कुठलेही गंभीर पाऊल आजअखेर उचलेले नाही.
2019 च्या अहवालानुसार संपूर्ण अमेरिकेचा विचार केला तर देशभरात 63,000 बंदूक/शस्त्र विक्रेते आहेत. त्यांनी 2019 या वर्षांत तब्बल 80 हजार कोटी रुपयांच्या शस्त्रांची विक्री केली होती. ही रक्कम भारताच्या अर्थसंकल्पातील आरोग्यासाठीच्या तरतुदींपेक्षा कितीतरी जास्त आहे.
* अमेरिकेत बंदुकीची मालकी असणाऱ्या नागरिकांची संख्या – 85 कोटी 70 लाख
* अमेरिका सोडून जगभरात बंदुकीची मालकी असणाऱ्या नागरिकांची संख्या – 39 कोटी 30 लाख
* जगातील शस्त्र बाळगणाऱ्या नागरिकांचा विचार केला तर त्यापैकी 46 टक्के नागरिक हे अमेरिकी आहेत.
* 2019 मध्ये अमेरिकेतील एक लाख लोकसंख्येमागे चारजण बंदुकीद्वारे झालेल्या हिंसाचाराचे बळी ठरले आहेत.
* अमेरिकेत होणाऱ्या आत्महत्यांपैकी 44 टक्के आत्महत्या या शस्त्राचा वापर करून होतात.
* अमेरिका हा असा विकसित देश आहे ज्या ठिकाणी अंदाधुंद गोळीबाराच्या घटना अधूनमधून घडत असतात.
* सुमारे 44 टक्के अमेरिकी नागरिकांच्या घरात बंदूक असते.
अमेरिकेत रोज सरासरी 321 जणांवर पिस्तूल/बंदुकीने हल्ला होतो. त्यापैकी….
* सरासरी 111 जण हल्ल्यात मरण पावतात.
* 210 जण हल्ल्यातून बचावतात.
* 95 जणांवर कुणीतरी हेतूतः हल्ला करतो आणि ते वाचतात.
* 42 जणांचा खून करण्यात येतो.
* 65 जण पिस्तुलाचा वापर करून आत्महत्या करतात.
* पिस्तुलाचा वापर करून आत्महत्येचा प्रयत्न करताना 10 जण वाचतात.
* रोज एकाचा कोणताही हेतू/कारण नसताना बंदुकीच्या हल्ल्यात मृत्यू होतो.
* विनाकारण हल्ले झालेल्यांपैकी 90 जण अशा हल्ल्यातून वाचतात.
* कायदेशीर हस्तक्षेपातील गोळीबारात एकाचा मृत्यू होतो.
* कायदेशीर हस्तक्षेपातील गोळीबारातून चारजण वाचतात.
* बंदुकीच्या हल्ल्यातून रोज सरासरी 12 जण वाचतात पण त्यांच्यावरील हल्ल्याचे कारण समजत नाही.