भाजप-राष्ट्रवादीत कलगीतुरा; एकाच पाण्याच्या टाकीचे एकाच दिवशी दोन वेळा उद्घाटन
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने पिंपरी प्रभागात उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे एकाच दिवशी भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उद्घाटन केले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी मंगळवारी दहा वाजता उद्घाटन केल्यानंतर भाजपाचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापौर माई ढोरे यांच्या हस्ते उद्घाटन केले. दोन पक्षातील दोन नगरसेवकांमध्ये रंगलेला हा कलगीतुरा पिंपरीवासियांमध्ये चर्चेचा विषय ठरला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी प्रभाग क्रमांक 21 मधील पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी श्रीमती अनुसया वाघेरे शाळेच्या प्रांगणात नव्याने पाण्याची टाकी उभारण्यात आली असून या टाकीचे “कै. दिलीप कुदळे, 20 दशलक्ष लिटर जलकुंभ’ असे नामकरण करण्यात आले आहे. या पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनासंदर्भात भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विरोधी भूमिका घेतल्याने एकत्र उद्घाटन करण्यात आले नाही. या प्रभागात भाजपाचा एक तर राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक आहेत. मंगळवारी (दि. 7) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीन उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे व विरोधी पक्षनेते नाना काटे, संध्या दिलीप कुदळे यांच्या हस्ते टाकीचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमास नगरसेविका उषा वाघेरे, निकिता कदम, नगरसेवक डब्बू आसवाणी, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांच्यासह रंगनाथ कुदळे, आनंदा जाचक, अण्णा कापसे, पालिकेचे अधिकारी रामदास तांबे, वाय. एम. गिरी, एस. यू. सरवदे, सुनील अहिरे, रघुनाथ शेमले यांच्यासह पिंपरी परिसरातील नागरिक, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिंपरीतील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादीने हा प्रश्न मार्गी लावल्याचा दावा यावेळी करण्यात आला.
राष्ट्रवादीचे उद्घाटन पूर्ण होताच साडेअकराच्या सुमारास भाजपाच्या वतीने उद्घाटन करण्यात आले. महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पार पडलेल्या या कार्यक्रमास नगरसेवक संदीप वाघेरे यांच्यासह सह शहर अभियंता मकरंद निकम, उपअभियंता सुनील आहेर, माजी नगरसेवक संतोष कुदळे, रंगनाथ कुदळे, कामगार नेते नरहरी कापसे, सामाजिक कार्यकर्ते किसन कापसे, चंद्रकांत गव्हाणे, रामभाऊ कुदळे, संध्या दिलीप कुदळे, रंजना जाधव यांच्यासह पिंपरीतील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. पाण्याच्या टाकीला कुदळे यांचे नाव दिल्याबद्दल संदीप वाघेरे यांचे आभार मानण्यात आले. तर पिंपरीतील पाण्याचा प्रश्न भाजपाच्या माध्यमातून संदीप वाघेरे यांनी सोडविल्याचा यावेळी दावा करण्यात आला.
यापूर्वीही झाला होता असाच प्रकार
पिंपरी आज झालेला श्रेयवादाचा प्रकार यापूर्वीही घडला होता. महापालिकेच्या वतीने पिंपरीमध्ये जिजामाता रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू करण्यावरून दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये कलगीतुरा रंगला होता. त्यावेळीही अशा पद्धतीने दोन वेळा उद्घाटन करण्यात आले होते. त्याचीच पुनरावृत्ती आज झाली.