पिंपरी चिंचवडकरांचा निर्धार, करूया करोना हद्दपार
पिंपरी – करोनाच्या संसर्गामुळे बाधित होणाऱ्या रुग्णसंख्येत घट होत असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र, करोनाच्या समूळ उच्चाटनाची लढाई अजून आपण पूर्णपणे जिंकलेली नसून आगामी काळात एकजुटीने प्रयत्न करून करोनाला कायमचे हद्दपार करण्याचा संकल्प करूया, असे आवाहन महापौर माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने “माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत आज पिंपरी चिंचवडकरांचा “निर्धार करूया करोना हद्दपार’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
प्रारंभी पिंपरी चिंचवड शहराच्या जडणघडणीचे शिल्पकार अण्णासाहेब मगर यांच्या प्रतिमेस महापौर ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महापौर ढोरे म्हणाल्या, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सर्वजण प्रयत्न करत आहे. “माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या माध्यमातून जनजागृती आणि सर्वेक्षणाचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. मात्र, अजून करोना पूर्णत: हद्दपार झाला नाही.
नागरिकांनी मास्कचा वापर, शारीरिक अंतर, सॅनिटायझरचा वापर करणे आदी सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. आता दसरा सण येत आहे यात महिलांचा सहभाग जास्त असतो. करोना आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी आपण साधेपणाने सण साजरे करावेत. गर्दीच्या ठिकाणी जाणे आणि गर्दी करणे टाळणे आवश्यक आहे. करोना मुक्त शहर करण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी महापौर ढोरे यांनी केले.
पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, माझे कुटुंब माझी जबाबदारी या सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. करोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी कोणीही करोना पूर्णपणे गेला असा समज करून घेऊ नये. या आजाराच्या संक्रमणाचा धोका अद्यापही कायम आहे. त्यामुळे गाफील न राहता आपण करोना विरुद्ध लढा द्यायचा आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका राज्यातील सर्वात चांगले काम निश्चित करेल. लोक सहभागातून करोना मुक्तीची मोहीम आपण यशस्वीपणे पार पाडू, असा विश्वास ढाके यांनी यावेळी व्यक्त केला.