दहा ठिकाणी दुरंगी, कोपरगावात चौरंगी, नगरात तिरंगी लढत
कार्ले, झावरे, चेडे, नागवडे, काकडेंच्या तलवारी म्यान
नगर – जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवड़णुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी कोपरगाव व नगर शहर वगळता कुठेही बंडखोरीचे ठळक पडसाद उमटलेले नाहीत.सर्वच बंडोबा काही शब्द घेवून तर काही तडजोडीतून थंड झाले आहेत. मात्र,कोपरगावमध्ये नगराध्यक्ष विजय वहाडणे व जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे या दोघांनीही माघार न घेतल्याने येथे चौरंगी लढत होणार आहे.तर,नगर शहरात तिरंगी लढत होत आहे.
माघार घेणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने पारनेरमधून संदेश कार्ले,सुजीत झावरे,वसंत चेडे,श्रीगोंद्यातून अनुराधा नागवडे,अण्णासाहेब शेलार,तर शेवगाव-पाथर्डीमधून हर्षदा काकडे,अमोल गर्जे यांचा समावेश आहे. अकोले, संगमनेर, शिर्डी, नेवासा, राहुरी, कर्जत-जामखेड या सहा मतदारसंघात आधीच दुहेरी लढती निश्चित होत्या. तर, पारनेर,कोपरगाव,नगर शहर,श्रीरामपूर,श्रीगोंदा,शेवगाव-पाथर्डी या सहा मतदारसंघात बंडखोरांच्या भुमिकेकडे सर्वाचे लक्ष होते.
त्यातही श्रीरामपुरमध्ये शनिवारीच शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव डॉ.चेतन लोखंडे यांनी माघारीची घोषणा केल्यामुळे श्रीरामपूरचाही तिढा सुटला होता. श्रीगोंद्यात महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार,तर शेवगाव-पाथर्डीत जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे व भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे हे माघार घेतील हे आधीपासूनच ठरलेले होते.
कोपरगावमध्ये नगराध्यक्ष विजय वहाडणे आधीपासूनच लढण्याच्या तयारीत होते.जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे हे पण लढणार असल्याची भूमिका मांडत होते. तरी पण मंत्री राधाकृष्ण विखे यांचे ते मेहुणे असल्याने विखे त्यांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडतील असे वाटत असताना परजणे यांचा राहिलेला अर्ज कुणाला लाभदायक व कुणाला तोट्याचा होणार हे निकालानंतर समजेलच.
पारनेरमध्ये जास्त उत्कटता असल्याचे भासवले गेले.मात्र येथेही तलवारी आधीपासूनच म्यान करण्याची तयारी होती.
शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी संपर्कप्रमुख अरविंद कोरेगावकर यांच्या माध्यमातून माघार घेण्यास भाग पाडले. आमदार विजय औटी यांच्याशी सख्य नसलेले माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत चेडे हे पक्षाच्या विरोधात भूमिका घेवू शकत नव्हते.त्यामुळे त्यांनीही तलावार म्यान केली.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे यांनी काही काळ विखेंच्या बळावर आपण लढणार असल्याचे वातावरण तयार केले. मात्र विखे यांना भाजपचेच कमळ व शिवसेनेचे धनुष्यबाणच बाराही मतदारसंघात चालवण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांचेच असल्याने त्यांनी झावरे यांना भाजपासोबत रहा भविष्यात मानाचे पान देवू असे सांगत बोळवण केली.
खासदार सुजय विखे आज सकाळपासून पारनेरमध्ये तळ ठोकून होते. आधी सुपा येथे चेडे समर्थक व नंतर पारनेर येथे झावरे समर्थकांची मनधरणी करण्यात त्यांना खुप कष्ट पडले नाहीत.यामुळे पारनेरमध्ये शिवसेनेचे विजय औटी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निलेश लंके यांच्यात सरळ लढत होत आहे.
नगर शहरात किरण काळे यांनी जगताप पिता-पुत्रांवर आरोप करत वंचित आघाडीची वाट आधीच धरली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरलेल्या नगरसेवक श्रीपाद छींदम शिवसेनेकडून सतत होणाऱ्या अपमानातून अनिल राठोड यांना इशारा देण्यासाठी बसपाच्या हत्तीवर स्वार झाले. राठोड यांच्याकडे जाणाऱ्या पदमशाली समाजाच्या मतांना छींदम तडा देवू शकतात.
तर दुसरीकडे माजी आमदार दादाभाऊ कळमकर व त्यांचे पुतणे अभिषेक कळमकर यांनी जगताप यांच्यावरील नाराजीतून सेनेचा भगवा खांद्यावर घेण्याच्या चर्चा सुरु आहेत. तसे झाल्यास जगतापांना नगर शहरात मोठा तोटा होवू शकतो.पण कळमकर जगतापांवर नाराज असले तरी शरद पवारांची साथ सोडण्याची शक्यता खूपच कमी आहे.
अशा होणार लढती…
पारनेर: विजय औटी(शिवसेना) निलेश लंके(राष्ट्रवादी कॉंग्रेस), कोपरगाव:स्नेहलता कोल्हे(भाजप) आशुतोष काळे(राष्ट्रवादी कॉंग्रेस) विजय वहाडणे (अपक्ष)राजेश परजणे (अपक्ष), नगर शहर: संग्राम जगताप(राष्ट्रवादी कॉंग्रेस) अनिल राठोड(शिवसेना) श्रीपाद छींदम (बसपा), संगमनेर : बाळासाहेब थोरात(,इंदिरा कॉंग्रेस) साहेबराव नवले(शिवसेना), अकोले:वैभव पिचड(भाजप) किरण लहामटे(राष्ट्रवादी कॉंग्रेस), शिर्डी:राधाकृष्ण विखे(भाजप) सुरेश थोरात(इंदिरा कॉंग्रेस), श्रीरामपूर: भाऊसाहेब कांबळे(शिवसेना) लहू कानडे(इंदिरा कॉंग्रेस), नेवासा: बाळासाहेब मुरकुटे(भाजप) शंकरराव गडाख (शेतकरी क्रांतिकारक पक्ष पुरस्कृत राष्ट्रवादी कॉंग्रेस), शेवगाव-पाथर्डी:मोनिका राजळे(भाजप) प्रताप ढाकणे(राष्ट्रवादी कॉंग्रेस), राहुरी:शिवाजी कर्डीले(भाजप) .प्राजक्त तनपुरे(राष्ट्रवादी कॉंग्रेस), श्रीगोंदा:बबनराव पाचपुते(भाजप) घनश्याम शेलार(राष्ट्रवादी कॉंग्रेस), कर्जत-जामखेड राम शिंदे (भाजप) रोहित पवार(राष्ट्रवादी कॉंग्रेस)