मालमत्तेचा आधार ज्येष्ठांसाठी लाभदायक (भाग-१)

गुंतवणूक ही सर्वांसाठी जिव्हाळ्याचा आणि विशेषत: आर्थिक सुरक्षितेसाठी महत्त्वाचा विषय. नोकरदार, उद्योजक, व्यावसायिक, पेन्शनर आदी प्रकारातील मंडळी आपापल्या परीने गुंतवणूक आणि बचत करत असतात. काही वर्षांपूर्वी सोने आणि रिअल इस्टेट हे दोन प्रकारचे प्रमुख गुंतवणुकीचे क्षेत्र होते. आज असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. असे असले तरी निवृत्तीनंतरच्या सुखकर जीवनासाठी मालमत्तेची गुंतवणूक आजही फायद्याची मानली जाते. दुसरीकडे उत्पन्न मिळवण्याच्या काळात घरासाठी कर्जाचे हप्ते भरणे कितपत योग्य आहे, हा देखील प्रश्‍न पडतो. मग घर घ्यायचे कधी, हा पण उपप्रश्‍न निर्माण होतो. एकंदरित बाजारातील वातावरण आणि गरज पाहून आर्थिकसंदर्भात निर्णय घेणे उपयुक्त ठरते.

मालमत्तेचा आधार ज्येष्ठांसाठी लाभदायक (भाग-२)

जसजसे वय वाढत जाते, तसतसे मालमत्तेतील गुंतवणूक ही अधिक फायद्याची वाटू लागते. जेव्हा आपण करिअर सुरू करतो, त्या तुलनेत निवृत्तीच्या काळात गुंतवणुकीसाठी मालमत्ता ही उपयुक्त ठरू लागते. सध्याच्या काळात मालमत्ता किंवा इमारतीच्या भाड्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. आठ ते दहा हजारांवर टू-बीएचके फ्लॅट भाड्याने मिळत आहे. मात्र, हेच घर खरेदीसाठी 50 ते 60 लाख रुपये मोजावे लागत आहे. म्हणूनच जमिनीच्या वाढत्या किमतीमुळे मालमत्तेतील गुंतवणुकीची रक्कमही वाढली आहे. अशा स्थितीत घराच्या भाड्यापासून मिळणारी रकमपेक्षा बॉंड किंवा शेअरमधून मिळणारा परतावा अधिक मिळत असल्याचे चित्र आहे. अन्य गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळत असताना मालमत्तेत गुंतवणूक का करावी, असा प्रश्‍न निर्माण होतो. सेवानिवृत्तीनंतर नियमित उत्पन्न थांबते. अशा स्थितीत स्टॉक मार्केटसारख्या चढउतार असलेल्या जोखमीच्या गुंतवणुकीपासून काही जण दूर राहतात. म्हणून गुंतवणूकदारांची पसंती ही मासिक उत्पन्न देणाऱ्या मुदत ठेवीला असते. त्याचा थेट संबंध हा चलनवाढीशी जोडलेला असतो. त्याचवेळी भाड्याची वाढ ही काही प्रमाणात का असेना ती निश्‍चित स्वरूपाची असते.

– कमलेश गिरी

Leave A Reply

Your email address will not be published.