मालमत्तेचा आधार ज्येष्ठांसाठी लाभदायक (भाग-२)

मालमत्तेचा आधार ज्येष्ठांसाठी लाभदायक (भाग-१)

सध्याच्या काळात गुंतवणुकीचे हस्तांतरण करणे गरजेचे झाले आहे. याचा अर्थ भौतिक मालमत्तेच्या ठिकाणी आर्थिक मालमत्ता असणे हा सर्वोत्तम पर्याय वाटू लागतो. सततच्या बदलीमुळेही गुंतवणुकीच्या पर्यायात बदल करावे लागतात. म्हणूनच सेवानिवृत्तीच्या काळात गुंतवणूक हस्तांतरण करणे ही मोठी समस्या राहात नाही. दुसरीकडे निवृत्तीनंतर एखादी मोठी मालमत्ता खरेदीऐवजी दोन किंवा त्यापेक्षा अधिक लहानसहान मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करता येतो. यातून भाड्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नातही वाढ होऊ शकते.

अर्थात मालमत्ता अशी खरेदी करावी, की ती कुलूपबंद करता येईल. जेणेकरून त्यावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी. याचा अर्थ नोकरीत असताना मालमत्तेत गुंतवणूक करू नये असा नाही. नोकरीच्या काळात नियमित किंवा भाड्याच्या उत्पन्नाच्या तुलनेत अधिक परतावा देणाऱ्या मालमत्तेत गुंतवणूक करणे श्रेयस्कर ठरू शकते. याचाच अर्थ गुंतवणूक अशा ठिकाणी करावी की त्यातून उत्पन्नापेक्षा भांडवली फायदा अधिक व्हावा. कारण या काळात नियमित उत्पन्न सुरू असल्याने काही काळापुरती का असेना अन्य नियमित स्रोतांची गरज भासत नाही.

रिअल इस्टेटमध्ये केलेली गुंतवणूक ही भविष्यात मुलांच्या विवाहासाठी उपयुक्त ठरू शकते. मात्र रोकडची गरज भागविण्यासाठी पूरक स्रोत असणे गरजेचे आहे. कारण कदाचित आपण केलेल्या गुंतवणुकीला रोख स्वरूपात बदल करण्यासाठी अडचणी येऊ शकतात. जमीन किंवा घर ही अशी मालमत्ता आहे की तत्काळ निधीच्या स्वरूपात प्राप्त होऊ शकत नाही. जमीन ही मालमत्ता चल प्रकारात मोडत नाही. त्यामुळे ती कधीही “एनकॅश’ करता येत नाही. या प्रकाराला गुंतवणुकीच्या श्रेणीला टाकता येत नाही. मग प्रश्‍न असा राहतो की, करिअरच्या प्रारंभी आपण स्वत:चे घर घ्यावे की नाही.

त्याचा संबंध भावनेशी जोडलेला असतो. आपण स्वत:च्या हक्काच्या घरात राहण्याचा आनंद घेऊ शकतो. फरक एवढाच की भविष्यासाठी आपण सध्याचे भांडवल हे अचल मालमत्तेत गुंतवत आहात, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. कारण घर खरेदी करण्यासाठी आपण आपल्या भविष्यातील उत्पन्नावर कर्ज घेतो. म्हणूनच आजकाल अनेक युवक भाड्याच्या घरात राहणे पसंत करत आहेत आणि जमवलेल्या पैशाचा उपयोग हा अनुभव मिळवण्यासाठी करत आहेत.

– कमलेश गिरी

Leave A Reply

Your email address will not be published.