ज्ञानप्राप्तीचे मूलभूत साधन श्रवणभक्‍ती

नवरात्रातील एकेक रात्री म्हणजे एकेका प्रकारच्या भक्‍तीचा उत्सव होय. भक्‍तिशास्त्रामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या नवविधभक्‍ती सर्वश्रुत आहे. श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम्‌। अर्चनं वंदनम्‌ दास्यम्‌ सख्यमात्मनिवेदनम्‌।। (श्रीमद्‌भागवत) मानवी जीवनात ऐकणे, श्रवण करणे ही एक अपरिहार्य क्रिया आहे. ज्ञानप्राप्तीचे ते एक मूलभूत साधन आहे. भारतीय तत्त्वज्ञानात एखाद्याच्या विद्वत्तेचे वर्णन करताना, तो बहुश्रुत आहे असे म्हटले जाते.

साधकाचा साधनविकास होण्यासाठी अध्यात्मात श्रवणेंद्रियाला महत्त्व आहे. कदाचित नेत्रेंद्रिय विकल असतील परंतु श्रवणेंद्रियाच्या सहाय्याने प्राप्त झालेल्या तत्त्वोपदेशाने अगदी संतत्वापर्यंतचा प्रवास करून जगालाही मार्गदर्शक ठरलेले सुरदासजींसारखे महात्मे आपल्या भारतवर्षात होऊन गेले.

जीवनात मोठ्यांची संगती असावी. त्यांच्याकडून काही ऐकावे. हे ऐकण्यासाठी आपणास त्यांच्यासमोर बसावे लागेल आणि ते सांगणारे प्रवक्‍ते श्रोत्यांपेक्षा उंच आसनावर असतील तेव्हा खाली बसण्याने आपली निराभिमानता सिद्ध होत असते. हाही श्रवणाचा फायदा आहे. भगवंताच्या स्वरूपाविषयी, गुणांविषयी, अवतार आणि लीला यांच्या कथा कानावर पडणे म्हणजे श्रवण भक्‍ती आहे. तिच्या सुलभत्वाविषयी ज्ञानेश्‍वरीतील निर्देश पाहिला तर, ज्ञानेश्‍वर महाराज म्हणतात, दूध आणि साखर खाऊन एखादा रोग दूर होणार असेल तर त्या रुग्णाने कडूनिंब का सेवन करावा, त्याप्रमाणे जीवनाचा परमोत्कर्ष केवळ श्रवणाने होत असताना बाकी खटाटोप कशाला?

श्रवणानंतर कीर्तन ही दुसरी भक्‍ती आहे. श्रवण भक्‍तीमध्ये काहीवेळा मर्यादा येते. तेव्हा वैयक्‍तिक अथवा सामुदायिकपणे आपल्या आराध्याचे कीर्तन शक्‍य आहे. भगवंताची कीर्ती वाढवण्यासाठी जे केले जाते ते कीर्तन, असे कीर्तनाचे स्थूलस्वरूप सांगता येईल. सगुण हरिकथा करावी। भगवत्कीर्ति वाढवावी।। (दासबोध) गोस्वामी तुलसीदासजींनी दुसरी रति मम कथा प्रसंगा असे म्हटले. भगवंताच्या कीर्तनासाठी त्याच्या कथा, नाम, लीला इत्यादीविषयी प्रेम असले पाहिजे. नवरात्रोत्सवातील गोंधळ हे या भगवद्‌प्रेमाचे द्योतक आहे, असे वर्णन ज्ञानेश्‍वर माऊली करतात. शुक सनकादिक गोंधळी हो करी कृपा। नाचताती प्रेमकल्लोळी हो करी कृपा।। (क्रमशः)

– हभप भागवत महाराज साळुंके

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.