‘बारामती पॅटर्न’ राज्यभर मार्गदर्शक ठरेल

जिल्हाधिकारी राम : अत्यावश्‍यक सामग्री उपलब्धतेचा आढावा

पुणे – करोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे. त्यानुसार बारामती येथील प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना या इतर भागासाठी अनुकरणीय असल्याने हा “बारामती पॅटर्न’ राज्यभर मार्गदर्शक ठरेल, असा विश्‍वास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केला.

करोना विषाणूमुळे बारामती येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्या पार्श्‍वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे प्रशासनाला आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. त्यानुषंगाने बारामती येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हाधिकारी यांनी बारामती येथे यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या उपाय योजनांची माहिती घेतली. यावेळी बारामती शहरामध्ये एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्यामुळे त्या व्यक्तीच्या आणि त्याच्या नातेवाईकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन त्या व्यक्तींना विलगीकरण करण्यात यावेत, त्यांच्या वैद्यकीय तपासणीबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात यावा, ज्या व्यक्ती होम क्‍वारंटाइन आहेत, त्यांच्या हातावर शिक्के मारल्याची खात्री करावी. वेळोवेळी त्यांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्याबरोबरच बारामतीमधील शासकीय रुग्णालये व खाजगी रुग्णालयांमध्ये तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्ष व बेड तसेच व्हेंटिलेटर व इतर अत्यावश्‍यक सामग्रीच्या उपलब्धतेचा आढावा घेतला.

असा आहे करोना प्रतिबंधाचा “बारामती पॅटर्न’
बारामती शहरात एकूण 44 झोन केले असून त्यामध्ये प्रत्येक झोनसाठी मदत सहायता अधिकारी, त्यांना सहाय्य करण्यासाठी 10 स्वयंसेवक व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 1 वॉर्ड मार्शल नेमण्यात आला आहे. यांच्या मदतीने आरोग्य सेवा, रेशन, अन्नधान्य पुरवठा, दूध व भाजीपाला, फळे, गॅस सिलेंडर घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत आहे.

या टीममार्फत करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी व त्याची साखळी तुटण्यासाठी ज्या रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, त्यांचे हायरिस्क कॉन्टॅक्‍ट व लो रिस्क कॉन्टॅक्‍ट शोधून वेळीच त्यांना अलग करण्यात येईल व गरज भासल्यास त्यांची कोविड तपासणी करण्यात येईल. आरोग्य विभागाकडून अशा रुग्णांची तपासणी करुन ज्यांना रक्तदाब (बीपी), मधुमेह (शुगर) व इतर गंभीर आजार असल्यास शोधून त्यांची तपासणी करता येईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.