पुरंदरमधून बारामती मुक्ती संग्राम पुकारत आहे – मुख्यमंत्री

सासवड – राजकीय स्वार्थापोटी पिढ्यान्‌पिढ्या जनतेची पिळवणूक करीत असलेल्या पवारशाहीला उलथवून टाकण्यासाठी बारामती मुक्तिसंग्राम पुकारण्यात आला आहे. आयुष्यात खूप कमी वेळा इतिहास घडविण्याची वेळ येते. तशीच वेळ आता आली आहे. ही संधी आता दवडली तर तुमच्या पुढील पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत. ही केवळ स्थानिक प्रश्‍नांची निवडणूक नाही, तर राष्ट्रीय अस्मिता, घराणेशाही विरूद्ध विकास अशी निवडणूक आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

बारामती लोकसभा मतदार संघाच्या भाजप, शिवसेना, रा.स.प., शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना, आर.पी.आय. महायुतीच्या अधिकृत उमेदवार कांचन राहुल कुल यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस यांची जाहीर सभा सासवड येथील ऐतिहासिक पालखी तळावर आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. सभेला राज्यमंत्री विजय शिवतरे, आमदार राहुल कुल, भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, खासदार संजय काकडे, संगिताराजे निंबाळकर, गणेश बिडकर, राजेश पांडे, महायुतीचे स्थानिक नेते, पदाधिकारी आदी उपस्थित होते.

शरद पवार यांना पुन्हा बारावा खेळाडू म्हणून संबोधित करीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आम्ही विकास करणारे आहोत. तर ते केवळ आपल्या राजकीय लाभासाठी समाजाला वापरणारे आहेत. कधी भावनिक, तर कधी सामाजिक दुफळी करून सत्ता टिकवणे हेच केवळ त्यांचे ध्येय आहे. आता त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहनही फडणवीस यांनी केले. पुरंदर विमानतळ हे येथील जनतेला विश्वासात घेऊनच करण्यात येणार आहे. या परिसराचा खरा औद्योगिक, कृषिविकास होणार आहे. पुरंदर बरोबरच भोर, वेल्हा परिसरात देखील पाणी देण्याचे नियोजन आहे. जेजुरीतील खंडोबा मंदीराच्या विकासाचाही आराखडा मंजूर करण्यात येणार आहे, असे आश्वासनेही त्यांनी दिले.

रेल्वेचे इंजिन संग्राहालयातील…
कुणी सायकल, मोटार सायकल, गाडी, बस भाड्याने घेतात. पण, हल्ली रेल्वे इंजिन भाड्याने घेतले जाते, अशी खिल्ली उडवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पवार यांच्या राजकीय भवितव्य प्रश्‍न निर्माण झाले आहे. म्हणूनच त्यांनी इंजिन भाड्याने घेतले आहे. ते ही इलेक्‍ट्रिक पॉवर नसलेले. कोळसा नसलेले आणि केवळ संग्रहालयातील आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.