टिकटॉकसह चिनी ऍप्सवरील बंदी राहणार कायम

नवी दिल्ली, दि.23 -टिकटॉकसह अनेक चीनी ऍप्सवरील बंदी भारताकडून कायम ठेवली जाणार आहे. तशा आशयाच्या नोटिसा केंद्र सरकारकडून संबंधित ऍप्सला पाठवण्यात आल्या आहेत.

भारताने मागील काही काळात दोनशेहून अधिक चीनी ऍप्सवर बंदी घातली. ती कारवाई करताना संबंधित ऍप्सकडून उत्तर मागवण्यात आले. आता त्यांच्या उत्तरांचा आढावा घेऊन केंद्रीय इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाकडून नव्याने नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडत्व, भारतीय सुरक्षा आदींना धोका पोहचवण्याच्या कारवायांमध्ये गुंतल्याचा ठपका ठेवत चीनी ऍप्सवर याआधीच बंदी घालण्यात आली. ती कारवाई करण्यात आलेल्या ऍप्समध्ये पब्जी, यूसी ब्राऊझर, शेअरइट, हॅलो, वुईचॅट आदींचाही समावेश आहे.

चिनी कुरापतींमुळे मागील काही महिन्यांपासून सीमेवर तणावाची स्थिती आहे. तशातच चीनी ऍप्सही चुकीच्या कृत्यांमध्ये गुंतल्याचा संशय बळावला. त्यातून चीनला झटका देण्यासाठी भारताने ऍप्सवर बंदी घालण्याचे धडक पाऊल उचलले. त्यामुळे संबंधित ऍप्सबरोबरच चीनलाही मोठा आर्थिक तडाखा बसल्याचे मानले जात आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.