पुणे( प्रतिनिधी) – करोनाग्रस्त रुग्णांवर वापरण्यात येणार्या रेमडेसीवर इंजेक्शनची बेकायदेशीररित्या विक्री करणार्या तरूणाचा जामीन अर्ज सत्र न्यायाधीश व्ही. आर जगदाळे यांनी फेटाळला. कृष्णा भास्कर हावणे (वय 25, रा. इंद्रायणीनगर, भोसरी. मुळ रा. खडकी, ता. वडवणी, जि. बीड) असे त्याचे नाव आहे.
25 एप्रिल रोजी रात्री दोनच्या सुमारास भोसरी परिसरातील संजीवनी कॉलनी परिसरात हा प्रकार उघडकीस आला होता. याबाबत, अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षकांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी कृष्णा याने न्यायालयात अर्ज केला. त्यास सरकारी वकील प्रदीप गेहलोत यांनी विरोध केला. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. गुन्ह्याच्या तपास अद्याप सुरू असून त्याला जामीन दिल्यास त्याला कायद्याची भिती राहणार नाही. त्याला जामीन दिल्यास तो या स्वरुपाचा गुन्हा पुन्हा करण्याची दाट शक्यता असून त्याविरोधात अद्याप दोषारोपपत्र दाखल करायचे असल्याने त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा अशी विनंती अॅड. गेहलोत यांनी न्यायालयाला केली. न्यायालयाने ती मान्य करत आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.