अयोध्या प्रकरणाच्या युक्‍तीवादास 18 ऑक्‍टोबर पर्यंतची मुदत

सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशिद प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वपुर्ण आदेश दिले आहेत. या खटल्याशी संबंधित पक्षकारांनी आपले युक्तिवाद कोणत्याही परिस्थितीत 18 ऑक्‍टोबरपूर्वी संपवावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी सुरू असलेल्या पाच सदस्यीय खंडपीठाचे नेतृत्त्व करणारे सरन्यायाधीस रंजन गोगोई यांनी हे आदेश दिले.

सरन्यायाधीशांनी या प्रकरणातील सर्व पक्षकारांना मंगळवारी त्यांचे युक्तिवाद कधीपर्यंत संपतील, या संदर्भातील माहिती विचारली होती. मागील 25 दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. गेल्या महिन्यापासून या प्रकरणी रोजच्या रोज सुनावणी घेतली जात आहे. येत्या 17 नोव्हेंबर रोजी रंजन गोगोई सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ते निवृत्त होण्याअगोदर या प्रकरणाचा निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. या प्रकरणातील सर्व पक्षकारांच्या वकिलांनी आपले नियोजित वेळापत्रक न्यायालयाकडे दिल्यावर बुधवारी न्यायालयाने 18 ऑक्‍टोबर हा युक्तिवादासाठी अंतिम दिवस निश्‍चित केला. जर गरज असल्यास या प्रकरणाच्या सुनावणीसाठी रोज एक तास जास्त वेळ बसण्यास आम्ही तयार आहोत, असेही खंडपीठाने यावेळी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.