प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 2 -“मी वसंतराव’ चित्रपटातील माझ्या भूमिकेबद्दल अनेकांच्या मनात साशंकता होती. दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्यांनी चित्रपटाचे जे चित्र मनात निर्माण केले, ते साकारण्याचा प्रयत्न आम्ही केला. या चित्रपटातील माझ्या अभिनयाला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारामुळे व्यक्ती आणि गायक म्हणून मी अधिक समृद्ध झालो, अशी भावना प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी व्यक्त केली.
यावर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे मानकरी ठरलेले गायक राहुल देशपांडे, अभिनेता सिद्धार्थ मेनन यांचा आणि “मी वसंतराव’चे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी या बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) माजी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. “डीईएस’चे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित, माजी प्राचार्य डॉ. अनिरुद्ध देशपांडे उपस्थित होते.
मेनन म्हणाले, “”जीवन जगण्यासाठी जे काही आवश्यक असते, ते “बीएमसीसी’मध्ये शिकविले जाते. त्याचा अभ्यासक्रमात समावेश नसतो आणि शुल्कही आकारले जात नाही. माझ्या करिअरची पायाभरणी “बीएमसीसी’त झाली. त्यामुळे येथे होत असलेला गौरव हे माझ्यासाठी सर्वोच्च सेलिब्रेशन आहे.”
धर्माधिकारी म्हणाले, “”जेव्हा काही करायचे असते, तेव्हा राहुल कोणासाठीही थांबत नाही. तो स्वतः त्यात उतरतो आणि ते काम पूर्ण करतो. त्यासाठी जे जे करणे अपेक्षित असते, ते ते करण्यासाठी तो नेहमीच तयार असतो. गायनातील शिस्त त्याच्या अभिनयात पूर्णपणे उतरली आहे. सक्षम अभिनय आणि संगीत दिग्दर्शनामुळे त्याने “मी वसंतराव’ वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला.”
“बीएमसीसी’ ही हिऱ्यांची खाण
“बीएमसीसी’ ही हिऱ्यांची खाण आहे. समाजातील कर्तृत्ववान युवक येथे शिकण्यासाठी येतात. त्यांचे कलाविषयक गुण हेरून हिऱ्याला पैलू पाडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महाविद्यालयात या शैक्षणिक वर्षापासून नाट्य-चित्रपट निर्मिती प्रशिक्षण अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. त्यामुळे “बीएमसीसी’ आणखी उंचीवर जाईल, असे शरद कुंटे म्हणाले.