…तर 9 जुलैपासून रिक्षाचालकांचा बेमुदत संप?

पुणे – राज्यातील ऑटो रिक्षा आणि टॅक्‍सी व्यवसायात घुसखोरी करणाऱ्या ओला आणि उबेर यासारख्या खासगी प्रवासी कंपन्यांवर बंदी आणावी, जिल्हास्तरीय प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या समितीवर एक अशासकीय सदस्यपदी रिक्षाचालकाची निवड करावी आदी रिक्षाचालकांच्या प्रलंबित मागण्या आणि प्रश्‍न 30 जूनपर्यंत मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी सोडवावेत. अन्यथा दि. 9 जुलैपासून बेमुदत संप करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षाचालक मालक संघटनेच्या संयुक्‍ती कृती समितीने दिला आहे.

रिक्षाचालक आणि मालकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत तोडगा काढण्यासाठी समितीचे अध्यक्ष शशांक राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलविली होती. यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे, शिवनेरी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अशोक साळेकर, आनंद तांबे, प्रदीप भालेराव, प्रकाश झाडे, विजय रवळे, सुरेश जगताप, अनिल यादव उपस्थित होते. प्रवाशांना वेठीस धरून संप करण्याचा आमचा हेतू नाही. परंतु, सरकार प्रश्‍न सोडविणार नसेल, तर दि. 9 जुलै रोजी रात्री बारा वाजल्यापासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे एक लाख रिक्षाचालक आणि मालक बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा शशांक राव यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.