पुणे : सत्ताधाऱ्यांना अखेर कर्मचाऱ्यांची आठवण

करोनाने मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना मदत देण्याची मागणी

पुणे – महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अखेर करोना नियंत्रणाच्या कामात मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांची आठवण झाली आहे. महापालिकेने घोषित केलेली 25 लाख रुपयांची मदत या कर्मचाऱ्यांच्या वारसांना द्यावी, अशी विनंती महापौरांनी पत्राद्वारे आयुक्तांकडे केली आहे.

हा मदत देण्याचा ठराव स्थायी समितीने मंजूर केला असून मुख्यसभेत मान्यतेसाठी आहे. त्यामुळे मुख्यसभा मान्यता देईल, या भरवशावर ही मदत देण्याची विनंती महापौरांसह सर्वपक्षीय नेत्यांच्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तर एका बाजूला मुख्यसभा मान्यता देईल या भरवशावर स्थायी समिती कोटयावधीच्या खर्चास मान्यता देते आणि मुख्यसभेची मान्यता होण्याआधीच अनेक खर्चाची बिले विनासायस दिली जात असताना, या कर्मचाऱ्यांचे हक्काचे पैसे देण्यासाठी मात्र विनंतीपत्राचा घाट घालण्यात आला आहे. दरम्यान, आतापर्यंत महापालिकेच्या सुमारे 25 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून अद्याप एकाही कर्मचाऱ्याला एक रुपयाचीही मदत देण्यात आलेली नाही.

हक्‍काच्या पैशांसाठी विनंती का ?
महापौर मुरलीधर मोहोळ आणि तत्कालिन आयुक्त शेखर गायकवाड यांनी करोना नियंत्रणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विमा कवच देण्याची घोषणा केली. त्यात केंद्राचा 50 लाखांचा विमा, तर महापालिकेकडून 25 लाख रुपये आणि एका वारसाला पालिकेत नोकरी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यताही दिली. त्यानंतर हा प्रस्ताव मुख्यसभेत आला, मात्र तिथे अद्याप मान्यता मिळालेली नाही. त्यातच, केंद्राने नेमलेल्या विमा कंपनीने पालिकेच्या कर्मचाऱ्यांना विमा देण्यास नकार दिला. त्यामुळे किमान आपली 25 लाखांची रक्कम द्यावी, अशी मृतांच्या वारसांनी केली.

मात्र, मुख्येसभेची मान्यता नसल्याचे सांगत गेली पाच महिने एकाही मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना एक दमडीही पालिकेने दिलेली नाही. त्यामुळे कामगार संघटना आणि विरोधीपक्षांकडून टीका सुरू होताच, आता प्रशासनाने पैसे द्यावेत, अशी विनंती करणारे पत्र सर्वपक्षीय नेत्यांच्या स्वाक्षरीने महापौरांनी दिले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.